तिवरंगच्या पुनर्वसनाची मागणी धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:36 PM2018-08-19T22:36:14+5:302018-08-19T22:37:17+5:30
तालुक्यातील तिवरंग येथील पूर संरक्षक भिंत, पुनर्वसनाची मागणी गेल्या २० वर्षांपासून धूळखात पडून आहे. रविवारी खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट देऊन ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील तिवरंग येथील पूर संरक्षक भिंत, पुनर्वसनाची मागणी गेल्या २० वर्षांपासून धूळखात पडून आहे. रविवारी खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट देऊन ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
तिवरंग येथील नाला काठावरील ८६ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी २००५ पासून धूळखात पडून आहे. पूर आल्यानंतर तेवढ्यापुरती धावपळ करायची आणि पूर ओसरला की सर्व विसरून जायचे, असा प्रकार सुरू आहे. तेथे नाल्याच्या काठावर किमान १०० कुटुंबे कसेबसे वास्तव्य करीत आहे. गावाची लोकसंख्या तीन हजार ८०० च्या घरात आहे. लोकसंख्या वाढत असताना भौगोलिक क्षेत्र तेवढेच आहे. त्यामुळे दाट वस्तीचे गाव म्हणूनही या गावाची तालुक्यात ओळख आहे.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकांना स्वतंत्र निवारा आवश्यक आहे. त्यासाठी जागेची निकड सर्वांनाच जाणवू लागली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या पूर स्थितीमुळे गावाला पूर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी आहे. तसेच रेड झोनमधील घरांचे पुनर्वसन करण्याची नितांत गरज असताना शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
समस्या मार्गी लावणार
खासदार राजीव सातव यांनी रविवारी तिवरंग, चिखली, वडद, पोहंडूळ, फुलसावंगी, मलकापूर, चिल्ली, मुडाणा परिसराचा भर पावसात दौरा करून तिवरंग येथील पूरसंरक्षक भिंत व पुनर्वसनाची मागणी मार्गी लावण्याची ग्वाही बालूसिंग जाधव, मधुकर जगन राठोड, सीमा जाधव यांना दिली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, किशोर भवरे, शिवाजी देशमुख सवनेकर, गजानन कांबळे, प्रेमराव वानखेडे, नारायण घुमनर, स्वप्नील नाईक, डॉ.अरुण पाटील, शैलेश कोपरकर उपस्थित होते.