आरक्षणासाठी धनगर समाजाचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:10 PM2018-08-23T22:10:16+5:302018-08-23T22:10:53+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नानंतर १९५० मध्ये अनुसूचित जाती, जमातीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात धनगर समाजाचा अभ्यास करून या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ वा क्रमांक देण्यात आला. मात्र राज्यकर्त्यांनी अद्याप धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाही. परिणामी हा समाज विकासापासून दूर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विद्यमान सरकार विरोधी पक्षात असताना त्यांनी सत्तेत आल्यानंतर आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. समाजाला संविधानाने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, शेळी-मेंढी पालनाकरिता चराईसाठी राखीव जंगल तसेच शासकीय जमिनीवर रहिवासी असलेल्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे, समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत शिष्यवृत्ती व स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. निवेदनावर श्रीधर मोहोड, सुखदेव नवरंगे, सुधाकर पिंगाणे, तुकाराम कोळपे, नथ्थू महानर, राजेश गोरडे, भानुदास आंबेकर, सुधाकर काळे आदींसह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे.