डेंग्यूचा डंख

By admin | Published: November 8, 2014 01:43 AM2014-11-08T01:43:12+5:302014-11-08T01:43:12+5:30

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने तापाचे रुग्ण वाढत आहे. यामध्ये जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर ..

Dengue | डेंग्यूचा डंख

डेंग्यूचा डंख

Next

सुरेंद्र राऊत यवतमाळ
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने तापाचे रुग्ण वाढत आहे. यामध्ये जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. डेंग्यूच्या डासाची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असतानाच आरोग्य यंत्रणेचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. प्रत्येक गावात डेंग्यूच्या तापाचा रुग्ण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्रेक होवूनही जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा केवळ कागदोपत्री उपक्रम राबविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.
गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात सातत्याने आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर या चार महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण आढळत आहे. या साथीच्या तापाचे नियंत्रण करण्यासाठी अद्यापही कुठली ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मुळात रोग होवूच नये यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसून येते. ज्या गावात उद्रेक झाला तिथे नागरिकांचा आरडाओरडा झाल्यानंतर धाव घ्यायची, अशी भूमिका आरोग्य यंत्रणेची आहे. साथीच्या तापाची लागण झाल्यानंतर व्हायचे ते नुकसान होते. प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्यास हे नुकसान टाळणे शक्य आहे. मात्र ही बाब आरोग्य यंत्रणाच काय स्थानिक लोकप्रतिनिधीही समजून घेण्यास तयार नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाने हुरळलेले आमदार-खासदार अद्यापही जमिनीवर आलेले दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये काय शहरातही मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. मात्र हारतुऱ्यात मशगूल असलेले हे लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्यांबाबत अद्याप तरी उदासीन असल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात साथीच्या तापाचे रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल होत असतानाही एकाही लोकप्रतिनिधीने आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला नाही.
निवडणूक काळात रुग्णसेवक म्हणून मिरवणाऱ्यांनीसुद्धा या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक गावात फवारणीच झालेली नाही. डेंग्यू हा जीवघेणा आजार असून त्याबाबत कुणीही फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवावी, खासगी पॅथॉलॉजीत तपासलेल्या नमुन्यांचाही अहवाल ठेवावा, असे निर्देश देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अशी कुठलीच व्यवस्था आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही. डेंग्यूंच्या रुग्णांचा अधिकृत आकडाच समोर येवू नये अशा पद्धतीने कामकाज केले जात आहे. खासगीतील डेंग्यूच्या रुग्णाचा आकडा समोर आल्यास आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघण्याची भीती आहे. त्यामुळेच ही आकडेवारी पद्धतशीरपणे दडपली जात आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तापाच्या रुग्णांची संख्या पाहता याचा अंदाज येतो. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत तब्बल ४८ हजार ८६६ तापाचे रुग्ण तपासणीसाठी आले होते. यापैकी ११ हजार २५८ रुग्णांना गंभीर अवस्थेत असल्याने दाखल करण्यात आले. याच कालावधीत १७ हजार ६८१ बालकही रुग्णालयात आले. त्यापैकी आठ हजार ८४ बालकांना दाखल करून घेण्यात आले. सलग तीन वर्षापासून डेंग्यूचे रुग्ण वाढत असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. डेंग्यूचा आजार हा चार प्रकारच्या संसर्गातून होतो. शास्त्रीयदृष्ट्या त्याला डेंग्यू टाईप १, २, ३, ४ असे संबोधण्यात येते. मागील वर्षी ज्याला डेंग्यू टाईप १ झाला अशा रुग्णाला यावर्षी डेंग्यू टाईप २ ची लागण झाल्यास त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. अशा रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचीही दमछाक होते.

Web Title: Dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.