पोलीस शिपायाचा मुंबईत डेंग्यूने मृत्यू
By admin | Published: September 17, 2016 02:40 AM2016-09-17T02:40:46+5:302016-09-17T02:40:46+5:30
गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेलेल्या तालुक्यातील करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वासी (नवी मुंबई)
गणपती बंदोबस्त : करंजी महामार्ग पथक
पांढरकवडा : गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेलेल्या तालुक्यातील करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वासी (नवी मुंबई) येथील फोर्टीस रूग्णालयात शुक्रवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. डेंग्यू सदृश्य आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
अनुपसिंह बघेल (३१) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेत यवतमाळ येथे कार्यरत असलेल्या अनुपसिंह बघेलची महिनाभरापूर्वीच १८ आॅगस्ट रोजी करंजी येथील महामार्ग पोलीस केंद्रात नियुक्ती झाली होती. याठिकाणी कर्तव्यावर असताना १२ दिवसांनीच त्याची महाराष्ट्र पोलीस केंद्र तळसने (जि.रायगड) येथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक झाली. त्यानंतर करंजी येथून ३० आॅगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी रायगड जिल्ह्यातील तळसने येथे जाण्यासाठी त्याला रवाना केल्याची माहिती करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक भरत कराळे यांनी दिली.
तेथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असतानाच ताणतणाव आणि वातावरणातील बदलामुळे त्याची १२ सप्टेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने वासी (नवी मुंबई) येथील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
डेंग्यूसदृश्य आजाराने अनुपसिंहचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अनुपसिंहच्या मृत्यूची माहिती करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रावर धडकताच कर्मचाऱ्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. मृत अनुपच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले व जम्मू कश्मिर येथे आर्मीमध्ये सेवेत असलेले दोन भाऊ तसेच आप्त परिवार आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)