डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By admin | Published: October 29, 2014 10:57 PM2014-10-29T22:57:31+5:302014-10-29T22:57:31+5:30
वातावरणातील बदल, गावागावातील अस्वच्छता आणि आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेने महागाव तालुक्यात डेंग्यू सदृश आजाराने थैमान घातले आहे. तालुक्यातील लेवा येथील सहा बालकांवर सध्या नांदेडच्या
रितेश पुरोहित - महागाव
वातावरणातील बदल, गावागावातील अस्वच्छता आणि आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेने महागाव तालुक्यात डेंग्यू सदृश आजाराने थैमान घातले आहे. तालुक्यातील लेवा येथील सहा बालकांवर सध्या नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अशीच स्थिती तालुक्यातील अनेक गावांची आहे. पंचायत समितीच्या मासिक सभेतही या विषयावरून आरोग्य यंत्रणेला धारेवर धरण्यात आले.
गेल्या महिनाभरापासून वातावरणात सारखा बदल होत आहे. त्यामुळे गावागावात ताप, खोकला, सर्दी, हिवताप यासह इतर आजाराने डोके वर काढले आहे. आरोग्य यंत्रणा सक्षमपणे गावात पोहोचत नसल्याने अनेकांना मेडिकल स्टोअर्समधून विकत आणलेल्या गोळ्यांवरच दिवस काढावे लागते. नेहमीच्या गोळ्या घेऊनही आजार बरा होत नाही. त्यावेळी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरच मिळत नाही. खासगी रुग्णालयात जायची सोय नसते. अशा स्थितीत अंगावर आजारपणे काढण्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो. यामुळेच आजाराचे थैमान वाढले आहे.
महागाव तालुक्यातील लेवा येथे डेंग्यू सदृश आजाराची अनेकांना लागण झाली आहे. त्यापैकी सुजित प्रदीप देशमुख (१२), वेदांत पंजाब देशमुख (६), राजू गणेश घोंगडे (१५), श्रीकांत प्रवेश खंदारे (७), रितेश विठ्ठल खंदारे (५), योगेश प्रमोद दरणे (७) या बालकांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या रक्तातील प्लेटलेट कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या गावात अनेकांना विविध आजारांची लागण झाली आहे. लेवा येथील किशोर खंदारे व प्रसाद देशमुख यांनी खडका येथील आरोग्य कर्मचारी आणि पोहंडूळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना या बाबत माहिती दिली. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.
फुलसावंगी, नारळी, आमणी, खडका, अंबोडा, वाघनाथ, दगडथर व इतर गावांमध्ये सध्या डेंग्यू सदृश आजाराचे थैमान दिसत आहे. परंतु आरोग्य यंत्रणा येथे पोहोचली नाही. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी करंजखेड येथे साथीच्या आजाराचा उद्रेक झाला होता. त्यात अशोक भांगे हा इसमाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. परंतु सध्या तरी आरोग्य यंत्रणा कोणत्याही गावात प्रभावीपणे काम करताना दिसत नाही. महागाव तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीवास्तव सेवानिवृत्त झाले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रभार फुलसावंगी येथील आरोग्य अधिकाऱ्याकडे आहे. प्रभारी अधिकाऱ्यामुळे आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याचे दिसत आहे. कोणत्याही गावातील रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची ओरड आहे.