दाट जंगल, त्यात वाघ अन् आता अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 09:32 PM2018-10-25T21:32:55+5:302018-10-25T21:33:44+5:30
कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह अधीक्षक अभियंत्यांपुढे रोष व्यक्त केला.
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, झाडकिन्ही, किनवट, अंतरगाव, मेटिखेडा, पिंपळशेंडा या गावातील नागरिकांनी गुरूवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी केली. या भागामध्ये वाघाची चांगलीच दहशत आहे. यातील पिंपळशेंडा गावात वाघाने एका व्यक्तीला ठार केले होेते. अलीकडे चार ते पाच दिवसांपासून या भागात वाघ दिसल्याची चर्चा आहे. यासोबतच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने दवंडी देऊन शेतशिवाराकडे जाण्यास मज्जाव केला आहे.
अशा स्थितीत रात्रीला भारनियमन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गावांनी कृषी फिडरवर टाकण्यात आले आहे. यामुळे या गावामध्ये १४ तासाचे भारनियमन होत आहे. भारनियमनाच्या ‘शेड्यूल’ व्यतिरिक्त होणारे भारनियमन वेगळेच आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी आम्ही गावात राहायचे की नाही, असा थेट प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकांना विचारला.
या भागात सकाळी ७ ते सायंकाळी चारपर्यंत वीज नसते. सायंकाळी ७ पासून ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा वीज गुल असते. याच अंधारात वाघ गावामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यातूनच संपूर्ण गाव दहशतीत आहे. शेतीकरिता रात्रीलाच वीज दिली जाते. या भागात वाघ असल्याची दहशत आहे. यामुळे शेतामधील ओलित थांबले आहे. कापूस, तूर आणि रब्बीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. गावामधील दहशत दूर करण्यासाठी रात्रीचे भारनियमन थांबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.
यावेळी या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विजय राठोड, कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, डोंगरखर्डाचे सरपंच निश्चल ठाकरे, सुरेंद्र चिंचोळकर, सुधाकर निखाडे, गणेश जाधव, रतीलाल पवार, दरणे पाटील, देवानंद वरफडे, प्रमोद मुनेश्वर, शेख आरीफ, विनोद पंचबुध्दे, सुभाष काकडे, शामलाल जयस्वाल, सिध्दार्थ पाटील, रमेश काचोरे, विठ्ठल येबरे, शेख सादीक उपस्थित होते.
ऊर्जा राज्यमंत्र्यांचे उपाययोजनेचे आदेश
वाघाच्या दहशतीमुळे कळंब तालुक्यातील अनेक गावे दडपणात आहे. अशा वेळी भारनियमन होत असल्याने भीती वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली व्यथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यापुढे मांडली. त्यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात भारनियमन न थांबल्यास आंदोलनाचा इशारा गावकºयांनी दिला आहे.