बोरी येथील बीज प्रक्रिया केंद्रावर कृषी विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:29 AM2021-06-05T04:29:29+5:302021-06-05T04:29:29+5:30
बोरी येथे यवतमाळ मार्गावर बिज प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणाहून गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची कोणत्याही प्रकारचे ...
बोरी येथे यवतमाळ मार्गावर बिज प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणाहून गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची कोणत्याही प्रकारचे लेबल न लावता खुलेपणाने विक्री केली जात असल्याचे बोलले जाते. कंपनीकडून खुल्या बाजारातून सोयाबीन आणि तुरीची खरेदी केली जाते. नंतर मशीनमधून छाटणी करून ३० किलोची बॅग तयार करून शेतकऱ्यांना विकली जाते.
इतर कंपनीच्या तुलनेत भावात फरक असल्याने येथील बियाण्याला मोठी मागणी आहे. याचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची विक्री केली जात असल्याचे सांगितले जाते. सध्या हंगाम तोंडावर आला असल्याने विक्री सुरू असताना शुक्रवारी अचानक पुणे, यवतमाळ, दारव्हासह काही ठिकाणच्या कृषी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त धाड टाकली.
बॉक्स
पंचनामा, सविस्तर तपासणीअंती निर्णय
या कंपनीकडे बिज प्रक्रिया केंद्र तसेच इतर कंपन्यांना शेतमाल विक्रीचा परवाना असल्याचे समजते. परंतु या परवान्याच्या आडून बेकायदेशीरपणे बियाण्यांची विक्री केली जात असल्याच्या संशयावरून ही धाड टाकण्यात आल्याची चर्चा आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सध्या चौकशी सुरू आहे. पंचनामा आणि सविस्तर तपासणीनंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात आली नव्हती.