विभागीय कार्यालयाची यंत्रणा झाली खिळखिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 09:26 PM2019-06-07T21:26:48+5:302019-06-07T21:27:10+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. अधिकारी त्यांच्या सोयीनुसार जबाबदारी पार पाडत असल्याने इतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. अधिकारी त्यांच्या सोयीनुसार जबाबदारी पार पाडत असल्याने इतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. विभागीय कार्यालयांतर्गत जवळपास सर्वच विभागाचा कारभार नियंत्रणात आणण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची गरज या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.
विभाग नियंत्रक कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी वाटेल तेव्हा येतात, सोईनुसार निघून जातात. लेखा शाखेतील जबाबदार ? अधिकारी, कर्मचारी टेबलवर सापडले तर नशिबच समजावे लागते. चालक, वाहक, यांत्रिक यांच्या वार्षिक वेतनवाढी, ग्रेडेशनची रखडलेली प्रकरणे ही लेखा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य तत्परतेची पावती आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंतिम देयकातील सुप्रमाची रक्कम गेली पाच - सहा महिन्यांपासून आॅडीटसाठी प्रलंबित ठेवली आहे. या सेवानिवृत्तांना या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. प्रकरण निकाली काढले जाईल या आशेने सेवानिवृत्त कर्मचारी तासंतास संबंधित कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत बसतात. शेवटी टेबलवर बसलेले आॅडीट अधिकारी दोन-चार दिवसांनी या, असे सांगून सेवानिवृत्तांची अवहेलना करतात.
आस्थापना शाखेतील कर्मचाऱ्यांना कामाविषयी थोडीही आस्था राहिलेली नाही. कार्यालयीन वेळेचे त्यांनी ‘बारा’ वाजवले आहे. बाहेर आगारातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांला त्यांची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते.
वाहतूक शाखेच्या कारभारालाही गैरप्रकाराची वाळवी लागली आहे. पथकातील वाहनाचा दुरूपयोग, शिक्षकांना दिल्या गेलेल्या किलोमीटर दर्शविणाऱ्या प्रमाणपत्रात अनियमितता झाली असल्याची चर्चा खुद्द या विभागात आहे. भविष्यनिर्वाह निधीचा टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची बहुतांश वेळा प्रतीक्षा करावी लागते. संबंधित अधिकारी सदर प्रकार का सहन करून घेतात हा प्रश्न आहे. विभागीय कार्यालयाची घडी एवढी विस्कळीत झालेली असताना वरिष्ठ अधिकारी बिनधास्त असल्याने नवल व्यक्त होत आहे.
अपराध शाखेत टाईमपास
अपराध शाखेतील अधिकारी विविध कारणांमुळे इतर आगाराच्या दौऱ्यावर असल्याच्या संधीचा पुरेपूर फायदा या विभागातील इतर कर्मचारी घेतात. काही न्यायालयीन कामे सांगून बाहेर असतात तर काहींचा कार्यालयाबाहेरच फेरफटका सुरू असतो.