सिंचनासाठी पाणी वापर संस्थाच उदासीन
By admin | Published: September 21, 2015 02:16 AM2015-09-21T02:16:25+5:302015-09-21T02:16:25+5:30
खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे
कामकाजावर प्रश्न चिन्ह : सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता
यवतमाळ : खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे. सिंचनासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पाणी वापर संस्थांकडे आहे. मात्र रबी पूर्वीच जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांमध्ये निरुत्साह दिसत असून यामुळे सिंचन प्रभावित होण्याची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्ह्यात १४० पाणी वापर संस्थांची नोंद पाटबंधारे विभागाकडे आहे. त्यापैकी ९० पाणी वापर संस्था विविध विभागात हस्तांतरित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात सिंचन करता यावे, या पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करता यावा म्हणून पाणी वापर संस्थांकडे धरणाचे क्षेत्र हस्तांतरित करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. त्या दृष्टीने पाटबंधारे विभाग काम करीत आहे. मात्र गाव पातळीवरील पाणी वापर संस्था मात्र उदासीन दिसत आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना जागरुक करणे आणि पाण्याचा कर भरुन घेण्यासोबत कालव्यातील अडचणी दूर सारण्याचे काम या संस्थांकडे असते. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र असे असतानाही संस्था त्या दृष्टीने फारश्या प्रयत्नशील दिसत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे.
या संस्थांवर आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. याला काही संस्था अपवाद असल्या तरी मोठ्या प्रमाणात संस्था पाणी वाटपाबाबत उदासीन दिसत आहे. (शहर वार्ताहर)