सिंचन क्षेत्र वाढीसाठी उदासीनता

By admin | Published: February 20, 2017 01:27 AM2017-02-20T01:27:13+5:302017-02-20T01:27:13+5:30

प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही.

Depression for the growth of irrigation area | सिंचन क्षेत्र वाढीसाठी उदासीनता

सिंचन क्षेत्र वाढीसाठी उदासीनता

Next

बेंबळाचे पाणी दारात : पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्नच नाही, बहुतांश क्षेत्र पारंपरिक पिकांचे
राळेगाव : प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी पोहोचूनही संधीचा लाभ दवडला जात आहे. पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न झाला नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात केवळ नासाडीच होत आहे. यासाठी हालचाली करून आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.
बेंबळा विभागाद्वारे गेली तीन महिन्यांपासून ठराविक अंतराने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यात ११ हजार ७०० हेक्टर सिंचन क्षमता त्यामुळे निर्माण झाली असल्याचा विभागाचा दावा आहे. राळेगाव तालुक्यात ३० पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांना चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सिंचनाकरिता पाणी मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. बेंबळाचे पाणी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या दारात आले आहे. मात्र पीक पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला नसल्याने या संधीचा लाभ घेता आलेला नाही.
शासनस्तरावर व राजकीयस्तरावर याकरिता आवश्यक ते प्रयत्नच झाले नसल्याने सिंचनाचा पुरेपूर उपयोग या तीन तालुक्यात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. खरीप हंगामातील कापूस व तूर, सोयाबीन या तीन परंपरागत पिकापलीकडे शेतीच केली जात नाही. त्यातच कापूस व तुरीच्या बहुतांश क्षेत्रात सिंचनाचे पाणी दिले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सध्या अपवाद वगळता गहू, हरभरा, भुुईमूग आदी सिंचनावर आधारित पिके कोठेही उभी दिसत नाही.
कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक वर्षांनंतर बेंबळा धरण पूर्ण झाले. आवश्यक प्रमाणात पाऊस झाल्याने धरणही भरले. कालव्यात पाणी आले, पण ज्या मुख्य उद्देशासाठी हे सर्व करण्यात आले तो उद्देश पूर्ण करण्याचे भान शासकीय-राजकीय यंत्रणेने दाखविले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे आता बोलले जात आहे. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून सिंचन क्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणे, त्याकरिता मेळावा घेणे आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक असताना त्याकडेही सर्व संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. आतातरी त्यासंदर्भात हालचाली करून आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह इतर पिकेही सिंचनाच्या भरवशावर घेवून समृद्धी साधली आहे. (तालुका प्रतिनिधी)

कालव्याच्या बाजूने हवे वीज खांब
ज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी बेंबळा कालव्यावरून शेतीकरिता सिंचनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी सर्वप्रथम डिझेल इंजिन आणले. दररोज ५०० ते ७०० रुपये डिझेलकरिता खर्चून सिंचनाची सुविधा निर्माण केली. अनेक शेतकऱ्यांना हे दोनही खर्च परवडत नाही. कालव्याच्या दोनही बाजूस इलेक्ट्रीक खांब उभारण्यात यावे, त्यावरून वीज पंपासाठी वीज देण्यात यावी, तेव्हाच सिंचनाचा खर्च परवडेल अशी त्यांची भूमिका व म्हणणे आहे.

Web Title: Depression for the growth of irrigation area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.