दिग्रस उपजिल्हा रुग्णालय, टामा केअर युनिटपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:59+5:302021-06-20T04:27:59+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करून दिग्रससह मानोरा, आर्णी तालुक्यातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी ट्रामा केअर ...
येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करून दिग्रससह मानोरा, आर्णी तालुक्यातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी ट्रामा केअर युनिट त्वरित सुरू करण्याची मागणी आहे. दिग्रस विकास कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. प्रदीप मेहता यांनी एका निवेदनातून आमदार संजय राठोड यांच्याकडे ही मागणी रेटून धरली अहे. आमदार राठोड यांनी याबाबत आरोग्य उपसंचालकांना ५ जूनला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
दिग्रस शहर शिक्षण व आरोग्य विषयक उच्च प्रतिच्या खासगी आरोग्य सुविधांबाबत जिल्ह्यात आघाडीवर आहे. शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य महामार्ग जातो. भविष्यात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग सुरू होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या, व्याप, विस्तार, २४ तास सुरू राहणारी रहदारी व अपघातांचे वाढते प्रमाण, अपघातग्रस्तांना जीवदान देण्यासाठी तातडीने उपचारासाठी येथे ट्रामा केअर युनिट व १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे.
येथे सुसज्ज इमारत व सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीने ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी दिग्रस विकास कृती समितीने आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार संजय राठोड यांच्याकडे केली आहे.
बॉक्स
जिल्ह्यात तीन केंद्रे प्रस्तावित
सध्या पांढरकवडा, दारव्हा, पूसद येथे उपजिल्हा रुग्णालये आहे. वणी, दिग्रस, उमरखेड हेही केंद्रे प्रस्तावित आहे. दिग्रस ग्रामीण रुग्णालयाचे विनाविलंब उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करून ट्रामा केअर सेंटर सुरू करून दिग्रस, मानोरा, आर्णी तालुक्यांसह काळी (दौ.) परिसरातील रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. अपघातग्रस्तांनाही त्वरित दिलासा मिळू शकतो.