उपसरपंचाने केला महिला सरपंचाचा विनयभंग; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 12:27 PM2022-10-12T12:27:48+5:302022-10-12T12:35:54+5:30
पोलिसांनी गुन्हे नोंदविले; ग्रामपंचायत कार्यालयातील वाद
महागाव (यवतमाळ) :सरपंच महिलेचा उपसरपंचानेविनयभंग केला, शिवाय मारहाण केली. तालुक्यातील एका गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
आरोपी उपसरपंच आहे. उपसरपंच असण्यासोबतच तो ग्रामपंचायत कार्यालयात संगणक ऑपरेटर म्हणूनही काम पाहतो. सरपंच या एका विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उपसरपंचा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत नाहीत, तसेच आपल्याकडे वाईट नजरेने बघतात, अशी सरपंच महिलेची तक्रार आहे. ग्रामसभेची मीटिंग नियोजित करावयाची असल्याने, सरपंच सकाळी कार्यालयात गेल्या. मीटिंग हॉलमध्ये त्या एकट्या असताना आरोपीने त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर, फरफटत बाहेर नेले. अश्लील शिवीगाळही केल्याची तक्रार सरपंचाने महागाव पोलिसांत दिली. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच महिलेच्या पतीविरुद्धही तक्रार
सरपंच महिलेच्या पती विरोधातही महागाव पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपली अल्पवयीन भाची ग्रा.प.कार्यालयात बोलावण्यासाठी आली असता, सरपंच महिलेचे पती व इतर चौघांनी तिच्याशी अश्लील चाळे केले, अशी तक्रार उपसरपंचाने दिली आहे. अल्पवयीन मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, भादंवि ३५४ व बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभारी ठाणेदार संजय खंडारे यांनी दिली.