शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये आरटीई समायोजनाचा खोडा
By admin | Published: November 1, 2014 01:18 AM2014-11-01T01:18:06+5:302014-11-01T01:18:06+5:30
दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे.
यवतमाळ : दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे. बदलीसाठी अधिर झालेल्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून जिल्हा परिषदेसमोर धरणे दिल्या जात आहे. या प्रकरणात तोडगा काढण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २२ आॅगस्ट २०१४ मध्ये दिलेल्या शासन आदेशानुसार २०११-१२ या वर्षात प्रशासकीय बदलीने बदलून गेलेल्या शिक्षकांच्या आपसी बदल्या करता येणार आहे. मात्र यासाठी शिक्षणहक्क कायदा २००५ मधील तरतुदीनुसार शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे. या समायोजनानंतरच आपसी बदलीची प्रक्रिया करण्याचे निर्देश या आदेशातून देण्यात आले आहे. ही अट घातल्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. आपसी बदल्याबाबत स्पष्ट निर्देश असले तरी ती प्रक्रिया करण्यासाठी अट घालण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्या संपत असून केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.
यामध्ये शिक्षण हक्क कायदा २००५ नुसार शिक्षकांचे समायोजन करणे शक्य नाही आणि या समायोजनापूर्वी आपसी बदल्या करता येणार नाही, अशी अटच शासन आदेशात आहे.
हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभाग सातत्याने आपसी बदल्यांसाठी टाळाटाळ करीत असल्याचे आरोप शिक्षक संघटनेकडून केले जात आहे. आपसी बदल्यांसाठी शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणात तोडगा काढू शकणार नाही ही बाब लक्षात आल्याने शिक्षकांनी आयुक्तांपुढे दाद मागण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
नेमका या प्रकरणात कोणता निर्णय होतो, याकडे बदली पात्र असलेल्या शिक्षकांचे लक्ष लागले आहे. शासकीय अटींच्या गुंत्यात ही बदली प्रक्रिया अडकली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा असे निर्देशही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)