देशी कट्टा हवाय? यवतमाळात या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 05:24 PM2021-09-23T17:24:31+5:302021-09-23T17:25:49+5:30
यवतमाळमध्ये अवघ्या काही हजारात देशी कट्टा सहजपणे उपलब्ध होतो. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळातील तरुण परवाना मिळवण्याच्या भानगडीत पडत नाही. या कट्ट्यांच्या धाकावर धमकावणे, लुबाडणे, मालमत्ता हडप करण्याचे प्रकार वाढले आहे.
यवतमाळ : यवतमाळ शहरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असून कमरेला कट्टा बांधून फिरण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहे. शहरातील अनेक व्यावसायिक, राजकारणी, अभियंत्यांनी कायदेशीररित्या ही शस्त्रे बाळगण्याचा परवाना मिळवला आहे. तर दुसरीकडे बेकायदेशीररित्या देशी कट्टे खरेदी करण्याचे प्रमाणही बरेच वाढल्याचे दिसून येते.
यवतमाळ गुन्हेगारीसाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे चांगलेच ओळखले जाते. संघटित गुन्हेगाराच्या टोळ्याही येथे आहेत. येथे अवघ्या काही हजारात देशी कट्टा सहजपणे उपलब्ध होतो. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळातील तरुण परवाना मिळवण्याच्या भानगडीत पडत नाही. या कट्ट्यांच्या धाकावर धमकावणे, लुबाडणे, मालमत्ता हडप करण्याचे प्रकार वाढले आहे. या शस्त्रांच्या आधारावर ही लोकल गुंडं रहिवासी परिसरात दादागिरी करतात.
पोलिसांनी हे प्रकार आटोक्यात आणण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे जप्तीसाठी प्लस टू योजना हाती घेतली आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही कमरेला कट्टा बांधून फिरणाऱ्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. विदर्भात देशी कट्टाविक्रेत्यांनी आपला चांगला जम बसवला आहे. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून रेल्वेमार्गे देशी कट्ट्याची खेप पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून पोहचवली जाते. ही शस्त्रे जंगलात जाऊन ग्राहकांच्या स्वाधीन केली जात असल्याची माहिती आहे.