पुसदमध्ये इच्छुकांचा हिरमोड
By admin | Published: June 9, 2014 11:51 PM2014-06-09T23:51:50+5:302014-06-09T23:51:50+5:30
नगरपालिकांच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आटोपल्याने जूनमध्ये पालिका अध्यक्षांची निवड होणार होती. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र विधीमंडळ अधिवेशनात
पुसद : नगरपालिकांच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आटोपल्याने जूनमध्ये पालिका अध्यक्षांची निवड होणार होती. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र विधीमंडळ अधिवेशनात नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर डोळा लावून बसलेल्यांचा हिरमोड झाला आहे.
पुसद नगरपरिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या अडीच वर्षापासून शिवसेनेच्या सहकार्याने राष्ट्रवादीची सत्ता अबाधित आहे. मागील वेळी अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले. यावर्षीही त्याची पुनरावृत्ती होते की काय, अशी चर्चा शहरात रंगत होती. मात्र नगराध्यक्षपदाला मुदतवाड मिळाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधणार्यांचा हिरमोड झाला. साधारणत: २0 जूनपर्यंत नगराध्यक्षपदाची निवडणूक होईल, या विचाराने अनेक जण मोर्चेबांधणी करीत होते. पक्षश्रेष्ठींकडे नगरसेवकांना घेऊन बांधणी सुरू होती.
सध्याचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी असल्याने सीताबाई कांबळे या पदावर कार्यरत आहे. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली. तसेच कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राष्ट्रवादी पक्षात होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या दोन महिलांच्या नावाचीही चर्चा होती. दोन्हीही नगरसेविका शिक्षिका आहे आणि विद्यमान नगराध्यक्षही सेवानवृत्त मुख्याध्यापिका आहे. परंतु नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढल्याने सर्वांची निराश झाली आहे. राष्ट्रवादीकडे सहा महिला नगरसेविका असल्यातरी यातील काही नगराध्यक्षपदापासून अलिप्त होत्या. पुढील अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे राजकीय खेळी खेळणे सुरू होती. नगराध्यक्ष पदासाठी एका नावाची निवड पक्षनेते मनोहरराव नाईक करणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्या निर्णयावर लागल्या होत्या. परंतु आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे कुणाच्या नाराजीला सामोरे जाण्याची कुणाचीही तयारी नाही. त्यामुळे नगराध्यक्ष कोण, अशी चर्चा रंगत असताना मुदतवाढ मिळाली.
याबाबत नगराध्यक्ष सीताबाई कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता अडीच वर्षाच कार्यकाळ २0 जूनला संपत आहे.त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त होऊन निवडूक लागणार, याची माहिती आपल्याला आहे. या पदाला मुदतवाढ मिळाली, अशी चर्चा कानावर आली आहे. मात्र अद्याप अधिकृत पत्र नगरपरिषदेकडे आले नाही. तसेच निवडणूक संदर्भात कार्यक्रमही जाहीर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)