शिक्षक भरती सुरू होऊनही ‘डीएड’ नापसंतच !

By अविनाश साबापुरे | Published: June 28, 2024 06:56 PM2024-06-28T18:56:23+5:302024-06-28T19:03:02+5:30

नऊ हजारांवर जागा राहणार रिक्त : ३० हजार जागांसाठी २१ हजार विद्यार्थ्यांचेच अर्ज

Despite the start of teacher recruitment, 'D.Ed' is not liked! | शिक्षक भरती सुरू होऊनही ‘डीएड’ नापसंतच !

Despite the start of teacher recruitment, 'D.Ed' is not liked!

अविनाश साबापुरे
यवतमाळ :
गेल्या वर्षीपासून राज्यात शिक्षक भरती सुरू झाली आहे. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल, अशी अटकळ असताना, यंदाही विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या ३० हजार ८०७ जागांसाठी केवळ २१ हजार १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. त्यामुळे ९ हजार ७०७ जागा यंदाही रिक्तच राहणार आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ३ जूनपासून डीएडची प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी १८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित अर्ज आलेले नाहीत. विशेष म्हणजे, याकरिता बारावीत केवळ ४९.५ टक्के इतके जुजबी गुण असलेला विद्यार्थीही प्रवेश अर्ज भरण्यास पात्र होता, तरीही उपलब्ध जागांएवढेही अर्ज न आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी डीएड अभ्यासक्रमाबाबत नापसंती दर्शविल्याचे चित्र आहे.


अशी आहे राज्यातील डीएडची स्थिती?
जिल्हा : विद्यालय : जागा : आलेले अर्ज
यवतमाळ : १४ : ७२० : ६५१
वाशिम : ०६ : ३५० : ३६३
बुलढाणा : २४ : १४६० : ९६९
अमरावती : ०९ : ४८७ : ४८६
अकोला : ०९ : ४२७ : ३७५
भंडारा : ११ : ५८७ : ४१८
चंद्रपूर : ०२ : ९० : ३६३
गडचिरोली : ०३ : २०० : ६६
गोंदिया : १८ : ८९० : ६४६
नागपूर : ३० : १४८२ : ५५८
वर्धा : १० : ३९७ : १०६
रत्नागिरी : ०४ : २७० : १३७
सिंधुदुर्ग : ०५ : १८७ : ६०
लातूर : २७ : १५९० : ११५९
नांदेड : २० : ११९७ : ११२१
धाराशिव : १६ : ७८० : ३४८
संभाजीनगर : ३५ : २०५७ : ११४३
बीड : ३० : १६२५ : १५२९
हिंगोली : ०७ : ४६० : २९८
जालना : १० : ६५० : ५४४
परभणी : १२ : ६५० : ६७६
कोल्हापूर : २० : १०२७ : ६४४
सांगली : १५ : ६७७ : ४५४
सातारा : १० : ४०० : २७६
अहमदनगर : ३४ : १८३० : १०१८
पुणे : २१ : १२६० : ५९६
सोलापूर : २९ : १६९५ : १०१४
धुळे : २१ : १२६० : ४६६
जळगाव : १५ : ८५० : ६१९
नंदुरबार : १० : ६५० : २८९
नाशिक : २४ : ९६० : १८१७
ठाणे : २६ : १४६० : ४६१
रायगड : ०३ : १५० : ६८
पालघर : ०६ : २८४ : ५४६
मुंबई : ३३ : १७४८ : ८१६
एकूण : ५६९ : ३०,८०७ : २१,१००


विद्यार्थ्यांचा कल थोडा बदलताना दिसत आहे. त्यामुळे कदाचित अर्ज कमी आले असतील. आता विद्यार्थ्यांना सिट अलाॅटमेंट होईल. सिट अलाॅटमेंट झाल्यानंतर शासनाच्या परवानगीने जेव्हा विशेष फेरी घेतली जाईल, तेव्हा कदाचित आणखी विद्यार्थ्यांचे अर्ज येतील.
- डाॅ. माधुरी सावरकर, उपसंचालक, एससीईआरटी, पुणे


या जिल्ह्यातील विद्यालयांवर संकट गडद
नाशिक वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये डीएडच्या उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी आहे. त्यातल्या त्यात गडचिरोली, वर्धा, सिंधुदुर्ग, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, धुळे, नंदुरबार, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत उपलब्ध जागांच्या निम्मेही अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे येथील अनेक अध्यापक विद्यालयांवर बंदीचे संकट घोंगावत आहे.

Web Title: Despite the start of teacher recruitment, 'D.Ed' is not liked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.