अमृतच्या कंत्राटदारामुळे शहराचा विकास गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 09:43 PM2019-03-27T21:43:00+5:302019-03-27T21:43:27+5:30

हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी काही कालमर्यादा असते. मात्र यवतमाळ शहरासाठी सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कंत्राटदाराने याचे भानच ठेवलेले नाही. त्यांच्या कामाची कासवालाही लाजवेल एवढी कमी गती आहे, असे म्हणावे लागेल. या योजनेच्या कामांमुळे शहराचा ‘विकास’ गोत्यात आला आहे.

Development of the city due to Amrit's contractor | अमृतच्या कंत्राटदारामुळे शहराचा विकास गोत्यात

अमृतच्या कंत्राटदारामुळे शहराचा विकास गोत्यात

Next
ठळक मुद्देयवतमाळकरांचे बेहाल : ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’, वाहतूकही बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी काही कालमर्यादा असते. मात्र यवतमाळ शहरासाठी सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कंत्राटदाराने याचे भानच ठेवलेले नाही. त्यांच्या कामाची कासवालाही लाजवेल एवढी कमी गती आहे, असे म्हणावे लागेल. या योजनेच्या कामांमुळे शहराचा ‘विकास’ गोत्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आलेली प्रामुख्याने रस्त्याची कामे थांबली आहेत.
दोन वर्षांपूर्वी अमृत योजनेच्या कामाला धूमधडाक्यात सुरुवात झाली. योजना पूर्ण करण्याचा कालावधी जवळ आला आहे. या कामाची आजची गती पाहता निर्धारित कालावधीत योजना पूर्ण होणार नाही हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. मात्र या योजनेची शहरात होत असलेली कामे इतर कामांसाठी मोठा खोडा ठरत आहे. खोदकामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. खड्डे, धूळ यामुळे लोक त्रस्त आहेत. रस्ते चांगले करण्यासाठी ‘अमृत’ची पाईपलाईन टेस्टींग व्हायची आहे, काम अपूर्ण आहे या व इतर प्रकारची कारणे सांगितली जात आहेत. यात बऱ्याच अंशी तथ्यही आहे. गोदणी रोड ते वीर वामनराव चौकापर्यंत प्राधिकरणाचे पाईप टाकून आठ ते दहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. अलीकडे कुठे या रस्त्याच्या दुरुस्तीला हात लागला. एवढे दिवस लोटल्यानंतर अमृतच्या कंत्राटदाराने ओके दिले नाही. आता तर मार्इंदे चौकात भलेमोठे खोदकाम करण्यात आले. पाईप टाकल्यानंतर काँक्रिटचे काम सुरू केले. या कामासाठी हा संपूर्ण मार्ग बंद करण्यात आला आहे. याशिवाय शिवाजी गार्डन मार्ग, गोदामफैल, शास्त्रीनगर, चर्च ते चांदणी चौक रोड, हनुमान आखाडा चौक परिसर खोदून ठेवलेला आहे.
लोकप्रतिनिधींना ‘विकास’ करायचा आहे. अनेक भागात भूमिपूजन झाले. या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात अमृतचा खोडा असल्याची ओरड केली जात आहे. एवढ्या मोठ्या योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही, ही साधार शंका व्यक्त केली जात आहे.

नवीन रस्त्यांना धोका
यवतमाळातील तहसील चौक ते हनुमान आखाडा चौकापर्यंत अमृतची पाईपलाईन वर्षभरापूर्वी टाकण्यात आली. बेंबळाचे पाणी आले नसले तरी या पाईपलाईनमधून मात्र पाणी वाहात आहे. हा चमत्कार शोधण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अजूनतरी यश आलेले नाही. तहसील चौकात असलेल्या सांडपाण्याच्या नालीतील पाणी लिकेजमधून शिरत असावे असा अंदाज बांधून शोध घेण्याचा प्रयत्नही फसला. आणखी शोधाचे अनेक प्रयत्न यासाठी होणार आहे. हा संपूर्ण रस्ता दीड-दोन महिन्यांपूर्वी गुळगुळीत करण्यात आला. ‘अमृत’चे लिकेज शोधण्यासाठी या रस्त्याचे बेहाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Development of the city due to Amrit's contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.