एक भाविक ठार, २५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:14 PM2018-03-28T23:14:48+5:302018-03-28T23:14:48+5:30

चैत्र महिन्यातील महाकाली मातेच्या यात्रेसाठी चंद्रपूर जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला समोरुन येणाºया ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले.

 A devotee killed, 25 injured | एक भाविक ठार, २५ जखमी

एक भाविक ठार, २५ जखमी

Next
ठळक मुद्देट्रक- मेटॅडोअरची भीषण धडक : चंद्रपूरला महाकाली दर्शनासाठी जाताना अपघात

ऑनलाईन लोकमत
रुंझा/मोहदा : चैत्र महिन्यातील महाकाली मातेच्या यात्रेसाठी चंद्रपूर जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. हा अपघात यवतमाळ- चंद्रपूर मार्गावरील पांढरकवडा तालुक्यातील ँमोहदा येथे बुधवारी पहाटे ३ वाजता घडला. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमध्ये फसलेला मेटॅडोअर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील धनेवाडी, करेवाडी, सायला, शिरपूर, उकडगाव, कावरगाव येथील भाविक मेटॅडोअरने (क्र.एम.एच-२४-ए-२३४४) चंद्रपूरकडे जात होते. या मेटॅडोअरमध्ये ३० ते ३५ भाविक प्रवास करीत होते. मोहदा गावाजवळ समोरुन आलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.३४-एबी-९९४९) मेटॅडोअरला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, मेटॅडोअर ट्रकमध्ये जाऊन फसला. पहाटेच्या वेळी एकच हलकल्लोळ झाल्याने लगतच्या हिंदुस्थान ढाब्याचे संचालक रिजवान शेख घटनास्थळी धावून गेले. त्या ठिकाणी अनेक जण जखमी अवस्थेत होते. त्यांनी तत्काळ पांढरकवडाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरमे यांना मोबाईलवरुन माहिती दिली. पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले. मेटॅडोअरच्या केबिनमध्ये फसून असलेल्या भाविकांना बाहेर काढणे कठीण जात होते. त्यामुळे जेसीबी बोलावून मेटॅडोअर ओढून काढला. त्यानंतर राळेगाव, पांढरकवडा आणि यवतमाळ येथून बोलाविलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.
या अपघातात रेणुका अनंत पिसाळ (२७) रा. कावरगाव ता. पुर्णा जि. परभणी या ठार झाल्या. तर इंदू दीपक जाधव, दीपक सखाराम जाधव, विनायक दीपक जाधव, भीमा शंकरराव शेवटे, गणेश ज्ञानोबा बोडखे, गोदावरीबाई शेवटे, शांताबाई कखार, धम्माजी समाजी साबळे, इंदूबाई धोंडीबा खिरटकर, प्रयाग सर्जेराव आगलावे यांच्यासह शोभाबाई मिरगे, लक्ष्मीबाई, चैत्राबाई जखमी झाले. जखमींपैकी शांताबाई कखार व धम्माजी साबळे यांची प्रकृती गंभीर आहे.
ढाबा चालक ठरला देवदूत
हा अपघात घडला तेथून काही अंतरावर हिंदुस्थान ढाबा आहे. मोठा आवाज झाल्याने ढाब्याचे संचालक रिजवान शेख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीच सर्व प्रथम पोलिसांना माहिती दिली. रिजवान वेळेवर पोहोचले नसते तर जखमींना उपचार मिळण्यास विलंब झाला असता. एवढेच नाही तर अपघातातून सुखरुप बचावलेल्या भाविकांना त्यांनी आपल्या ढाब्यावर आणले. त्या ठिकाणी चहा-पानासह या भाविकांची भोजनाचीही व्यवस्था केली. अपघातग्रस्तांसाठी रिजवान शेख देवदूतच ठरला.
११ महिन्याचा मुंजा सुखरुप
या भाविकांच्या मेटॅडोअरमध्ये ११ महिन्याचा मुंजा सोपान लांडे हा आई विमलसोबत दर्शनासाठी जात होता. अपघातानंतर प्रत्येक भाविकाला मार लागला. परंतु मुंजाला साधे खरचटलेही नाही. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला.
मेटॅडोअरमधील पाट्यांनी केला घात
मेटॅडोअरमधून ३० ते ३५ भाविक प्रवास करीत होते. यासाठी मेटॅडोअरमध्ये पाट्यांचे पार्टिशन करण्यात आले होते. अपघातानंतर बसलेल्या जबर धक्क्याने या पाट्या आणि त्यावर बसलेले भाविक खालच्या बाजूला असलेल्या भाविकांवर कोसळले. लाकडी पाट्यांचा डोक्याला जबर मार लागल्याने जखमींची संख्या वाढल्याचे प्रत्यक्षदर्शिनी यावेळी सांगितले.

Web Title:  A devotee killed, 25 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात