गणरायाला भक्तिपूर्ण निरोप
By Admin | Published: September 16, 2016 03:01 AM2016-09-16T03:01:26+5:302016-09-16T03:01:26+5:30
गेले दहा दिवस मनोभावे उपासना केल्यानंतर गुरुवारी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यवतमाळ
यवतमाळ : गेले दहा दिवस मनोभावे उपासना केल्यानंतर गुरुवारी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यवतमाळ शहरात देखाव्यांमध्ये कल्पकता दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकाही ‘निर्विघ्न’ पार पाडल्या. विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे काही किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित घटना घडली नाही.
दहा दिवसांचा गणपती बसविणाऱ्या सर्वसामांन्य घरगुती भाविकांनीही हातगाडीवर मूर्तीची सजावट करून छोटेखानी मिरवणुका काढल्या. ‘एक दोन तीन चार गणपती की जयजयकार’ असा जयघोष करीत बच्चे कंपनी मिरवणुकांच्या पुढे चालत होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तर चौका चौकात गुलालाची उधळण करीत उत्साहात आनंदाचा रंग भरला.
यवतमाळातील गणेशोत्सवाच्या विसर्जनाला बुधवारपासून प्रारंभ झाला. गुरूवारी मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. यासाठी यवतमाळ नगरपरिषदेने लकडगंज परिसरात मोठे जलकुंड निर्माण केले होते. या जलकुंडाच्या बाजूलाच निर्माल्य कलश उभारण्यात आला. त्यात हार, फुल आणि पुजेचे साहित्य विसर्जित करण्यात आले. याचे खत तयार करण्यात येणार आहे. जलकुंडात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विरघळल्याच नाही. या मूर्ती विरघळण्यासाठी खाण्याचा सोडा हौदात टाकण्यात येणार आहे. यामुळे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विरघळतील.लकडगंजमधील जलकुंडाला मिळालेला प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी नगरपरिषद शहरालगतच्या सर्वच भागात जलकुंड उभारणार आहे.