ग्रामीण अंगणवाड्या पडताहेत ओस
By admin | Published: June 11, 2014 11:40 PM2014-06-11T23:40:40+5:302014-06-11T23:40:40+5:30
१० ते १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना चांगले दिवस होते. गावातील चिमुकले सकाळी १० वाजता नटून-थटून जेवणाचा डब्बा घेऊन अंगणवाडीत जात असत. परंतु काळ बदलला.
पुसद : १० ते १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना चांगले दिवस होते. गावातील चिमुकले सकाळी १० वाजता नटून-थटून जेवणाचा डब्बा घेऊन अंगणवाडीत जात असत. परंतु काळ बदलला. त्याची जागा कॉन्व्हेंटने घेतल्याने ग्रामीण भागातील अंगणवाड्यांनाही उतरती कळा लागली आहे.
इंग्रज या देशातून हद्दपार झाले असले तरी त्यांच्या इंग्रजी भाषेने भारतीय मनावर परिणाम केला आहे. त्यांची परिणती आज इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृतीत झाली आहे. इंग्रजी दुधावर पोसली जाणारी कोवळी मुले मातृभाषेपासून दुरावत आहे. शहरी संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर असणारे कॉन्व्हेंटचे वारे आता ग्रामीण भागात पोहचले आहे. आज पुसद तालुक्यातील ग्रामीण भागात १० ते १२ कॉन्व्हेंट सुरू आहेत. तालुक्यात २४४ अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारा सुविधांचा अभाव,
विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दिशेने नसणारे वातावरण हेही महत्त्वाचे कारण विद्यार्थी गळतीचे असल्याचे बोलल्या जाते.
शहरी विभागाप्रमाणे ग्रामीण भागातही कॉन्व्हेंटचे भरपूर पीक आले आहे. इंग्रजी शिक्षणाची क्रेझ असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना अंगणवाडीत टाकण्याऐवजी कॉन्व्हेंटमध्ये टाकत असल्याने ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना उतरती कळा लागली आहे. आधी ग्रामीण भागातील चिमुरडे ‘नाच रे मोरा’ हे गीत तोतड्या आवाजात हमखास घरी म्हणायचे, पण आता कॉन्व्हेंटच्या जमान्यात या गीतांची जागा जॉनी जॉनी एस पप्पा, टिष्ट्वंकल टिष्ट्वंकल या इंग्रजी गीतांनी घेतली आहे.
प्राथमिक पूर्व शिक्षणाचा पाया म्हणून आधी बालवाडींकडे पाहिले जायचे. लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी बालवाड्यांवर असायची. मात्र आता हे चित्र पूूर्णत: बदलून गेले आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्यिकांची मुलेसुद्धा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसत आहे. परिणामी मराठी शाळासुुद्धा ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शिक्षणाचे दिवसेंदिवस वाढणारे फॅड यामुळे अंगणवाड्यासह मराठी माध्यमांच्या शाळा अखेरच्या घटका मोजत आहे. (तालुका प्रतिनिधी)