दिग्रस वीज वितरणचा कारभार चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 10:12 PM2019-05-05T22:12:06+5:302019-05-05T22:12:25+5:30
येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे.
शहरातील गवळीपुरा येथील विद्युत रोहित्रामध्ये सोमवारी रात्री अचानक स्पार्किंग झाली. यात रोहीत्र जळून खाक झाले. उन्हाळ्यात रोहीत्र जळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र वीज वितरण कंपनी याकडे लक्ष देत नाही. कोणतीही दक्षता घेतली जात नाही. अपघात घडण्यापूर्वीच दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यात रोहीत्र जळण्याचे प्रकार सुरूच आहे.
यानंतर गुरुवारी मध्यरात्री २ वाजतानंतर दिनबाई शाळेसमोरील मेन सर्व्हिस लाईनची तार अचानक तुटली. यामुळे शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला. ही बाब एका नागरिकाच्या निदर्शनास येतात, त्यांनी महावितरणच्या अभियंत्याला माहिती दिली. मात्र त्या अभियंत्याचे मोबाईल उचलण्यास कर्मचाऱ्यांना सवड नव्हती. अखेर अभियंता पटेल व त्या नागरिकाने स्वत: इतर नागरिकांच्या सहकार्याने तुटलेल्या तारा जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत पोलिसांनीही घटनास्थळ गाठले होते.
वीज वितरणचे बहुतांश अधिकारी बाहेर गावी राहातात. त्यांच्या हाताखालील कर्मचारी आणि कंत्राटदार स्थानिकचे रहिवासी आहे. हे कर्मचारी व कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नाही. उलट अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव निर्माण केला जातो, अशी चर्चा आहे. वीज केंद्रातील रात्रपाळीचे कर्मचारी जाणीवपूर्वक वीज पुरवठा बंद करून जनतेला त्रास व्हावा व जनतेत अधिकाऱ्यांविरूद्ध रोष निर्माण व्हावा म्हणून अशी कृत्ये करीत असल्याचा आरोपही आता होत आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक मोबाईल स्विच आॅफ करून ठेवले जातात. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन अधिकाऱ्यांना परिस्थितीला सामोरे जावे लागते. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आता ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा नागकि व्यक्त करीत आहे.
कर्मचारी, कंत्राटदारांची टगेगिरी वाढली
वीज वितरणचे कर्मचारी, कंत्राटदार अधिकाऱ्यांना जुमानत नाही. स्थानिक कर्मचारी, कंत्राटदार, कामगार यांच्या टगेगिरीमुळे अधिकारी हतबल झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांविरूद्ध जाणीवपूर्वक रोष वाढवून कंत्राटदार आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. अधिकारी व कर्मचारी आणि कंत्राटदारांमधील या शीतयुद्धाचा परिणाम मात्र जनतेला सोसावा लागतो. त्यांना नाहक दिवसा उकाड्यात, तर रात्री अंधारात राहावे लागत आहे. वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी समन्वय ठेवून ग्राहकांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.