ढाणकीची पाणीटंचाई पाचवीलाच पुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:56 PM2019-05-02T21:56:24+5:302019-05-02T21:57:15+5:30

ढाणकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊनही गावाचा विकास खुंटला आहे. नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला अपेक्षा होती. प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला व गावकरी संतापलेले आहेत.

Dhajani water shortage, Pujali is the fifth | ढाणकीची पाणीटंचाई पाचवीलाच पुजली

ढाणकीची पाणीटंचाई पाचवीलाच पुजली

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : महिलांची पाण्यासाठी विहिरीवर रांग, गावाची पाणीपुरवठा योजना पडली ठप्प

अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : ढाणकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊनही गावाचा विकास खुंटला आहे. नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला अपेक्षा होती. प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला व गावकरी संतापलेले आहेत.
नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर गावाच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा दुवा असलेले मुख्याधिकारी येथे राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांचे दर्शनच झाले नाही. ढाणकीला पैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा होत होता. मात्र आता पैनगंगा नदीचे गांजेगाव येथील दरवाजे उघडल्याने तेथे नदी पात्रात पाणीच उरले नाही. तेथे साचलेल्या गढूळ पाण्याचा ढाणकीला पुरवठा करण्यात आला. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून आलेले हेच पाणी त्यांना प्राशन करावे लागले. त्यावर शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करता तसेच पाणी गावकऱ्यांना पुरविण्यात आले. दूषित पाणी हेच सर्व साथ रोगांचे मूळ कारण असते. मात्र कपडे धुण्यायोग्य हे पाणी नसताना ढाणकीवासीयांना असे पाणी पुरवठा करणारे शासन, प्रशासन मूग गिळून बसले. वरिष्ठ अदिकारी, लोकप्रतिनिधी हे पाणी प्राशन करतील काय, असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहे.
गावातील पाणी विक्रेत्यांचा व्यवसाय जोरात चालावा, यासाठीच तर हा खटाटोप नाही ना, अशी शंका गावकरी उपस्थित करीत आहे. गावकरी भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असताना लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यांना जनतेचे कोणतेही सोयसुतक नाही. दरवर्षी पाणीटंचाई येते, मग आंदोलने होतात, वेळ मारून नेण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र गावाला कायमस्वरूपी व्यवस्था न झाल्याने सर्वांनीच या गावाला वाºयावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे.
ढाणकीकर संयमी असल्याने त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या जात नाही. परिणामी आबालवृद्ध भर उन्हात, रात्री हंडाभर पाण्यासाठी डोक्यांवर भांडी घेऊन वणवण भटकत आहे. आपल्या मुलीवरही लग्नानंतर जन्मभर असेच पाणी भरण्याची वेळ येईल, या भीतीने गावात मुलगी द्यायला वधू पिता धजावत नाही. दुसरीकडे माहेरवाशीन मुलीला माहेरी येण्याची विनवणी करताना पालकांना जड जात आहे. या परिस्थितीवर एका पित्याने चक्क कविताच लिहिली. ही कविता सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या कवितेवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर मांडली जात आहे. सोबतच प्रशासनाची लक्तरे टांगली जात आहे.

बापाच काळीज चर्रर्र, रसाला येऊ नको
उन्हाळ्यात प्रत्येक मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुरलेली असते. विदर्भात उन्हाळ्यात मुली माहेरा येतात. सोबत जावयालाही आंब्याच्या रसासाठी बोलविण्याची पद्धत आहे. मात्र ढाणकीत पाणीटंचाईमुळे बापाचे काळीज चर्रर्र होत आहे. स्वत: पिताच मुलीला माहेरी येऊ नको म्हणून विनवणी करीत आहे. परिणामी यावर्षी उन्हाळ्यात बापाच्या घरी जाऊन पाहुणपण करणाºया मुलींच्या नशीबी चार सुखाचे क्षण येणार की नाही, असा प्रश्न आहे. मुलींची ाालमेल होत आहे. वर्षातून एकदा तरी माहेरी जाण्यासाठी त्या आसुसलेल्या आहेत. मात्र ढाणकीतील पाणीटंचाईमुळे जन्मदातेच त्यांना माहेरी येण्यापासून रोखत असल्याचे विदारक चित्र आहे. एका बापाने आपल्या कवितेतून अव्यवस्थेवर जोरदार आसूड ओढला आहे. तथापि लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आणि सर्व व्यवस्थाच निगरगट्ट झाली आहे. आता समाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ढाणकीतील महिला, नागरिकांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुली तु ढाणकीला माहेरी येऊ नको
मुली तु ढाणकीला माहेरी येऊ नको,
मी तुझा बाप स्वत: म्हणतो,
मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,
उगीच स्वत:ची आबदा करुन घेऊ नको,
पंधरा-पंधरा दिवस येथे नळाला पाणी येत नाही,
विनंती, तक्रार केली, तरी कोणी दखल घेत नाही,
सुखी जीव तू तुझा उगी टांगणीला ठेवू नको,
मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,
येथे सर्व रस्त्यात जीवघेणे खड्डे,दुर्गंधीचे राज्य,
प्रचंड माती आणि धुळीचे साम्राज्य,
चांगल्या शरीराला आजाराचे निमंत्रण देऊ नको,
मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको,
निष्क्रीय राजकारण्यांच्या दहशतीचा ताप आहे,
त्रासाची आम्हां सवय, तू काळजी करू नको,
मुली तू ढाणकीला माहेरी येऊ नको’.

Web Title: Dhajani water shortage, Pujali is the fifth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.