गुजरातला मुजरा करून उगवतो सत्ताधाऱ्यांचा दिवस - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 03:34 PM2022-12-06T15:34:52+5:302022-12-06T15:36:42+5:30
हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी देणार धडक
यवतमाळ : महाराष्ट्रातील सरकार गुजरातला शरण आहे. येथील सत्ताधाऱ्यांचा दिवस हा गुजरातला मुजरा करून उगवतो आणि मावळतो. राज्यात निर्लज्जपणाचा कळस गाठला जात आहे. सुरुवातीला येथील आमदार गुजरातला गेले, त्यानंतर प्रकल्प गेले आता सीमावर्ती भागातील गावही महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्याची भाषा करीत आहे. याची खंत येथील सत्ताधाऱ्यांना नाही, अशा शब्दात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. यवतमाळात सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्राचा स्वाभिमान व येथील थोर पुरुषांच्या अपमानाची मालिकाच सुरू आहे. सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. राज्य सरकार नेमके काय करतेय हेही दिसत नाही. कर्नाटक, तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमावर्ती गावाप्रमाणेच आता नाशिक जिल्ह्यातील सुरगाना तालुक्यातील ५० गावांनी गुजरातमध्ये जाण्याची मागणी केली आहे. ही बाब राज्यासाठी भूषणावह नाही. मात्र त्यावरही राज्य सरकार कोणतीच भूमिका घेण्यास तयार नाही, असे मुंडे म्हणाले.
दीड लाख हाताला रोजगार देणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्या पाठोपाठ अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले अशा थोरामोठ्यांचा सातत्याने अपमान केला जात आहे. या सर्व घटनांचा जाब विचारण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादीचा धडक मोर्चा जाणार आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून २५ हजारांवर कार्यकर्त्यांनी नागपूरकडे कूच करावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणाला वाचा फोडण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, माजी आमदार राजू टेकाम, तारीक लोखंडवाला, बाबासाहेब गाडे पाटील, नानाभाऊ गाडबैले, क्रांती धोटे, उत्तम गुल्हाने आदी मंचावर उपस्थित होते.
अन् सभा संपताच सुरक्षा रक्षक कोसळला
विराट आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित सभा संपताच धनंजय मुंडे सभागृहाबाहेर आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी सुरू असतानाच त्यांचा सुरक्षा रक्षक धनंजय पांडे अचानक कोसळला. नेमके काय झाले हे समजले नाही. तातडीने त्याला वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी हृदयविकाराचा सौम्य झटका असल्याचे सांगितले. त्याच्यावर उपचार सुरू होते.