ढाणकी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले
By admin | Published: January 14, 2015 11:16 PM2015-01-14T23:16:12+5:302015-01-14T23:16:12+5:30
वारंवार सांगूनही वॉर्डातील नाल्यांचे बांधकाम, अंतर्गत रस्ते तयार झाले नाही. कचऱ्याची स्वच्छताही केली जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले.
ढाणकी : वारंवार सांगूनही वॉर्डातील नाल्यांचे बांधकाम, अंतर्गत रस्ते तयार झाले नाही. कचऱ्याची स्वच्छताही केली जात नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले. ही घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे घडली.
ढाणकी येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.६ मध्ये टेंभेश्वरनगर परिसर येतो. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला या वॉर्डात नालीचे बांधकाम आणि अंतर्गत रस्त्याची मागणी नागरिकांनी केली. तसेच कचऱ्याची स्वच्छता करण्यासही वारंवार सांगण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी ही कामे पूर्ण करू, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र हे आश्वासनही हवेतच विरले. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला.
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष विजय धोपटे आणि ग्रामपंचायत सदस्य सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक ग्रामपंचायतवर धडकले. यावेळी त्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकून नाकर्तेपणाचा निषेध नोंदविला. तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यास ग्रामपंचायतीने कुचराई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. नागरिकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्यानंतर प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. काही काळ तणावाची स्थिती होती. (वार्ताहर)