नेर पालिकेसाठी आज धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:13 PM2018-12-08T21:13:24+5:302018-12-08T21:14:01+5:30
येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे. त्यासाठी ९३ उमेदवार रिंगणात आहेत. ९ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी शहरात २९ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्रांवर दहा हजार ७३ पुरुष, तर दहा हजार ४० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी २९ मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय १८ नगरसेवक पदांसाठी रणसंग्राम होत आहे. सर्वच पक्षांना बंडखोरांनी ग्रासले आहे. दुखावलेले कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीने तर चॅनलसमोर बंडखोरी व नाराजीचे उघड समर्थन केले. सर्वच पक्षांना अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. त्यामुळे कोणताही पक्ष एकहाती सत्ता मिळवू शकणार नाही, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत. मतदारही यामुळे संभ्रमात पडले आहे.
या निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहे. भाजपाने शिवसेनेला टार्गेट करीत वैयक्तिक आरोपांचा सपाटा लावला होता. मात्र भाजपातील संजय देशमुख गट प्रचाराच्या बाहेर आहे. शिवसेनेतही बंडाळी झाली आहे. काँग्रेसलाही बंडखोरीची लागण झाली आहे. या सर्वच पक्षांचे नाराज कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.
सहा केंद्र संवेदनशील
निवडणुकीसाठी २९ केंद्रांवर प्रत्येकी पाच मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्यात आदेश दिले आहे. याशिवाय निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे यांनी २९ पैकी सहा मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगितले. या केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणेदार अनिल किनगे बंदोबस्तावर नजर ठेऊन आहे.