दहा मिनिटांत २८ रुग्णांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:12 AM2017-10-23T01:12:54+5:302017-10-23T01:13:04+5:30

कीटकनाशक फवारणी विषबाधितांच्या भेटीसाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी यवतमाळात आगमन झाले.

Dialogue with 28 patients in 10 minutes | दहा मिनिटांत २८ रुग्णांशी संवाद

दहा मिनिटांत २८ रुग्णांशी संवाद

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी घेतली विषबाधितांची भेट : वैद्यकीय महाविद्यालय परिसराला छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कीटकनाशक फवारणी विषबाधितांच्या भेटीसाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी यवतमाळात आगमन झाले. विमानतळावरून थेट वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन अवघ्या दहा मिनीटांत २८ विषबाधितांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या या दौºयाबाबत प्रचंड गोपनीयता राखण्यात आली होती. तसेच या दौºयानिमित्त वैद्यकीय महाविद्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला होता.
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून २१ शेतकरी, शेतमजुरांचा कीटकनाशकांच्या फवारणीने मृत्यू झाला, तर आठशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. कृषीमंत्री, आरोग्यमंत्री, कृषी राज्यमंत्री, विधानसभा व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह अनेकांनी विषबाधितांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा ठरतच नव्हता. यासाठी यवतमाळात आंदोलनही करण्यात आले होते. विरोधी पक्षांनीही त्यांच्या दौºयासाठी ताशेरे ओढले होते. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या दौºयाचा मुहूर्त ठरला. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा प्रचंड गोपनीय ठेवण्यात आला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत या दौºयाबाबत कुणी सांगायला तयार नव्हते.
रविवारी मुख्यमंत्र्यांचे विमानाने यवतमाळात सकाळी आगमन झाले. तेथून थेट त्यांचा ताफा वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचला. त्या ठिकाणी अतिदक्षता कक्षातील पाच आणि वॉर्ड क्रमांक १८ मधील २३ रूग्णांशी त्यांनी संवाद साधला. कोणते औषध फवारले होते, उपचार कसे सुरू आहेत, अशी विचारपूस करीत रुग्णांना दिलासा दिला. अवघ्या दहा मिनीटांत मुख्यमंत्र्यांनी २८ रूग्णांशी नेमका कसा संवाद साधला, हे मात्र प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना दूर ठेवल्याने कळू शकले नाही. अत्यंत घाईगडबडीत दुसºया मजल्यावरील वॉर्डातील रूग्णांशी संवाद साधून अवघ्या दहा मिनीटांत ते तळमजल्यावर आले.
मुख्यमंत्र्यांच्या दौºयानिमित्त वैद्यकीय महाविद्यालय परिसर व जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. चोख बंदोबस्त ठेवला होता. कुणालाही या परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. याचा फटका प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बसला.
प्रसार माध्यमांनीच फोडली वाचा
फवारणीमुळे मृत्यूमुखी पडणाºया शेतकरी, शेतमजुरांचे वास्तव प्रसार माध्यमांमुळे पुढे आले. मात्र शासकीय यंत्रणेला त्याचे गांभीर्य वाटले नाही. संपूर्ण यंत्रणेने सक्षमतेने काम करायला हवे होते. पुढील काळात असा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. कृषी विभागाच्या मोहीम अधिकाºयांनी आणि यंत्रणेने बाजारातील हालचाली टिपल्या पाहीजे. त्यावर करडी नजर ठेवायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
बंदोबस्तावरील पोलिसांनी रोखला आढावा बैठकीचा चहा
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या तगड्या बंदोबस्ताचा फटका मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी चहा घेऊन जाणाºया शिपायालाही बसला. जिल्हा कचेरीतील शिपाई चहा घेऊन प्रवेशव्दारावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अडविले. बैठकीचा चहा आहे असे सांगूनही पोलीस आत सोडायला तयार नव्हते. शेवटी त्या शिपायाने नाझरला मोबाईलवरून माहिती दिली. नाझर धावत प्रवेशव्दारावर आले, ओळखपरेडनंतर बैठकीचा चहा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहाकडे रवाना झाला.
आंदोलक स्थानबद्ध
मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक आंदोलकांना स्थानबद्ध केले होते. विश्रामगृहाजवळ मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणाºया युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांना अटक केली. संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ताब्यात घेतले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही स्थानबद्ध केले. शहरातील काही आंदोलकांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवले होते. काही संघटना व संस्थांच्या पदाधिकाºयांना आंदोलन करू नये म्हणून नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
प्रिंटिंग व्यावसायिकांना तंबी
शासनाच्या विरोधातील कुठलेही फ्लेक्स अथवा बॅनर शहरात झळकू नये याची प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतली होती. शनिवारी रात्रीच शहरातील प्रिंटिंग व फ्लेक्स व्यावसायिकांना पोलिसांकडून यासंदर्भात तंबी देण्यात आली होती.

Web Title: Dialogue with 28 patients in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.