कोलामी, गोंडी, बंजारा, मराठी भाषेत संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:12 PM2019-02-16T22:12:34+5:302019-02-16T22:13:13+5:30
सर्वसाधारणपणे कोणताही राजकीय नेता सामान्यपणे आपल्या भाषेत भाषणाची सुरुवात करतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परंपरेला फाटा देऊन चक्क भाषणाची सुरुवातच कोलामी, गोंडी आणि बंजारा भाषेतून केली आणि उपस्थितांना धक्का बसला.
अविनाश साबापुरे/ संतोष कुंडकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा (यवतमाळ) : सर्वसाधारणपणे कोणताही राजकीय नेता सामान्यपणे आपल्या भाषेत भाषणाची सुरुवात करतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परंपरेला फाटा देऊन चक्क भाषणाची सुरुवातच कोलामी, गोंडी आणि बंजारा भाषेतून केली आणि उपस्थितांना धक्का बसला. प्रत्येक भाषेतून संवाद साधताना त्यांनी त्या-त्या समाज समूहातील संतांची नावे घेऊन त्यांना अभिवादन केले.
येथील महिला बचतगटांच्या महामेळाव्यातील गर्दीच्या मनाला हात घालताना पंतप्रधान मोदींनी बोलीभाषेचा हात धरला होता. यवतमाळ जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात त्यातल्या त्यात पांढरकवडा तालुक्यात कोलाम, गोंड आणि बंजारा समाजबांधवांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. नेमका हाच धागा पकडत मोदींनी या तीन समाज समूहाच्या बोलीभाषेत संवाद साधला. तसेच मुंगसाजी माऊली, संत सेवालाल महाराज, श्यामादादा कोलाम यांचा उल्लेख करून अभिवादनही केले. ‘परिसरेरमाई बंजार भाई बहणो मारो मनपूर्वक जय सेवालाल’, ‘जय श्यामादादा’ असे म्हणत असतानाच मोदी ‘रामराम’ करायलाही विसरले नाहीत, हे विशेष.
शिवसेनेचे मंत्री, खासदार दूरच
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपाची युती निश्चित झाली आहे. दोघांनाही एकमेकांच्या मतांची गरज आहे. परंतु त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवड्यातील सभेकडे शिवसेनेचे नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावनाताई गवळी व सेनेच्या अन्य नेत्यांनी या सभेकडे पाठफिरविल्याचे चित्र पहायला मिळाले. कार्यक्रम शासकीय असताना हा दुरावा कशासाठी याची चर्चा होती. भाजपाचा असला तरी युतीचा धर्म निभावताना सेना नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. युती असूनही असाच दुरावा निवडणुकीतही राहणार नाही ना? असा सूर होता.