जिल्ह्यात डायरियाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:24 PM2018-06-28T22:24:27+5:302018-06-28T22:25:38+5:30
दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. यवतमाळ शहरात नळावाटे येणाऱ्या दूषित पाण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याच दूषित पाण्याने शहरातील विविध भागात डायरियाची लागण झाली आहे.
यवतमाळ शहरातील सिंघानियानगर, वंजारीफैल, पिंपळगाव, चमेडियानगर या भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. यवतमाळ शहरात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गत १५ दिवसांपासून निळोणा प्रकल्पाचे पाणी नळावाटे सोडले जात आहे. मात्र या पाण्याच्या गुणवत्तेवर नागरिकांना सुरुवातीपासूनच शंका आहे. अनेक भागात नळावाटे आलेले पाणी दुर्गंधी युक्त आणि हिरवट रंगाचे होते. त्यातच शहरातील शिवाजी गार्डन परिसरात नळ योजनेचा मुख्य व्हॉल फुटून गटाराचे पाणी शिरले आहे. तेच पाणी नळावाटे वितरित होत आहे. त्यामुळे ही डायरियाची लागण झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यवतमाळ शहरात एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईमुळे दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे डायरियाचे रुग्णही सातत्याने येत आहेत. माळीपुरा परिसरात कॉलरा सारख्या आजाराचीही भर उन्हाळ्यात लागण झाली होती. यात एकाचा मृत्यूही झाला. २ एप्रिलपासून वैद्यकीय महाविद्यालयात ३२४ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ४३ रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहे.
जिल्ह्यातील वाटखेड, म्हसोला, जामडोह, नागीपोड, वडकी, तिवसा, येवती, मांगलादेवी या गावातूनही मोठ्या प्रमाणात डायरियाचे रुग्ण उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले व वृद्धांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयात १५ जून २६ जून या दहा दिवसात तब्बल ९८ रुग्ण दाखल झाले. मोठ्या प्रमाणात डायरियाचे रुग्ण येत असल्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी प्रशासनालाही याची माहिती दिलेली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालयाला डायरियाची लागण झाल्याबाबत अवगत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात विहिरींचे पाणी निर्जंतुकीकरण होत नसल्यानेही आजार बळावत आहे. याकडे पंचायत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
अशी घ्या पावसाळ्यात आरोग्याची काळजी
पावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने डायरियाचा आजार बळावतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी पाणी गाळून व उकळून प्यावे.
पाणी व अन्य पदार्थ हे झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन ड्रॉप टाकावा. पाणी काढण्यासाठी दांडीच्या भाड्याचा वापर करावा.
उघड्यावरचे अन्न पदार्थ खावू नये, गरम व नुकतेच शिजलेले अन्न पदार्थ खावे. कच्च्या पालेभाज्या व अर्धवट शिजलेले अन्न पदार्थ खान्याचे टाळावे.
जेवणापूर्वी व शौचालयानंतर साबनाने हात धुवावे. उघड्यावर शौचास जाऊ नये. कटाक्षाने शौचालयाचा वापर करावा.
उघड्यावर कचरा टाकू नये. घरात माशा होणार नाही, याची काळजी घ्यावी. लहान मुलांना खेळल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून द्यावे आदी दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
शासकीय रुग्णालयात डायरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा सज्ज आहे. आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे. त्या भागात उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना वैद्यकीय महाविद्यालयाकडून नियमित माहिती देण्यात येत आहे.
- डॉ.मनीष श्रीगिरीवार,
अधिष्ठाता, वैद्यकीय
महाविद्यालय, यवतमाळ