उमरखेड येथे डायरियाची साथ
By admin | Published: May 3, 2017 12:16 AM2017-05-03T00:16:48+5:302017-05-03T00:16:48+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात उन्हाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. तापमानातील प्रचंड वाढीमुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे.
रुग्णालयात गर्दी : डॉक्टरांची दमछाक, आवश्यक सोयी-सुविधा नाही
उमरखेड : गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात उन्हाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. तापमानातील प्रचंड वाढीमुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. गावागावात डायरियाची लागण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे.
एप्रिलनंतर आता मे महिना सुरू झाला आहे. तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी रुग्णसंख्याही वाढली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णांना सेवा पुरविताना डॉक्टर व कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्याचाच अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी पर्याप्त जागा उपलब्ध नाही. काही ठिकाणी औषधीसाठ्याचा तुटवडा आहे, तर काही ठिकाणी डॉक्टर व कर्मचारीच अपुरे आहे. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकामध्ये नाराजीचा सूर आहे.
उमरखेड शहर व तालुक्यात प्रामुख्याने डायरियाची लागण अधिक प्रमाणात दिसून येत आहे. शासकीय रुग्णालयात उलटी, संडास, ताप आदी लक्षणांचे सर्वाधिक रुग्ण दाखल झाले आहे. त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कसरत होताना दिसत आहे. उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात इंदूमती खंदारे, कैलास गायकवाड, बेबीताई राठोड, फर्जाना शेख, नंदा गायकवाड, नजरानाबी, नजाबी परवीन, सागरबाई काळबांडे, चंद्रभागा लांबटिळे, शेख अब्बास, पायल राठोड, वैशाली सगने, रूबीना कैसर, गिरजा वाळूकर, गीता पडाळेकर, फर्जाना मोसिन, पल्लवी व्यवहारे, सयाबाई जाधव, वैष्णवी काळे, ज्योती पवार, गौतम भवरे आदींसह शेकडो रुग्ण उपचार घेत आहे.
रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व इतर व्यवस्था तोकड्या असल्याचे दिसत आहे. डायरियाच्या या साथीवर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधांचा अभाव दिसून येत आहे. या बाबत जिल्हा आरोग्य विभागाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे रोष
एकीकडे तालुक्यात साथीच्या आजारानी तोंड वर काढले असून घराघरात रुग्ण आढळून येत असताना आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाय-योजनाच केल्या जात नसल्याचा आरोप आहे. याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधीही लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यातून या आजारांना निमंत्रण मिळत आहे. रुग्णालयांमध्येसुद्धा आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे.