यवतमाळच्या नवोदयकडे मुलांनी पाठ फिरविली की शिक्षकांनी?
By अविनाश साबापुरे | Published: August 1, 2023 05:32 PM2023-08-01T17:32:04+5:302023-08-01T17:33:14+5:30
जवाहर नवोदय विद्यालय घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून गोरगरीब गुणवंतांसाठी वरदान ठरले आहे.
यवतमाळ : बारावीपर्यंत निवासी स्वरुपाचे उत्तम शिक्षण मोफत देणाऱ्या नवोदय विद्यालयाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आठ हजार ७१५ नोंदणीचे उद्दिष्ट असताना केवळ ३६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या परिस्थितीला नेमके विद्यार्थी जबाबदार आहेत, की त्यांना चांगली दिशा दाखविणारे शिक्षक जबाबदार आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्याचे भूषण असलेले जवाहर नवोदय विद्यालय घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून गोरगरीब गुणवंतांसाठी वरदान ठरले आहे. दरवर्षी जिल्ह्यातील पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेऊन त्यांना इयत्ता सहावीमध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जातो. या परीक्षेला बसण्यासाठी दरवर्षी अक्षरश: चढाओढ पाहायला मिळते. परंतु सध्या सुरू असलेल्या २०२४ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी उद्दिष्टाच्या केवळ पाच टक्के अर्ज आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मागील वर्षी या परीक्षेसाठी सात हजार ९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता २०२४ च्या प्रवेशासाठी २० जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुरू करताना नवोदय विद्यालयाच्या पुणे येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मागील वर्षीपेक्षा १० टक्के अधिक नोंदणीचे लक्ष्य निश्चित करून दिले. त्याबाबत १९ जुलै रोजी बेलोरा येथील नवोदय विद्यालयाला पत्रही पाठविण्यात आले. त्यात यंदाचे उद्दिष्ट आठ हजार ७१५ इतके आहे. परंतु, आतापर्यंत केवळ ३६२ विद्यार्थ्यांचे अर्ज आलेत. आता १० ऑगस्ट या अखेरच्या तारखेपर्यंत उद्दिष्टाच्या किमान निम्मे तरी अर्ज येतात का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अर्ज वाढविण्याचा प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.
अशी आहे नवोदय प्रवेशाची सध्यस्थिती
तालुका : उद्दिष्ट : आलेले अर्ज
आर्णी : ४५० : २६
बाभूळगाव : ३६१ : ००
दारव्हा : ६६३ : १२२
दिग्रस : २३४ : ०२
घाटंजी : ५४९ : १९
कळंब : २९२ : ११
महागाव : ६०३ : १५
मारेगाव : ३५२ : ०८
नेर : ४६५ : ००
पांढरकवडा : ४८४ : २२
पुसद : ८१३ : २०
राळेगाव : ३३१ : २१
उमरखेड : १२०५ : ५३
वणी : ७७४ : ०६
यवतमाळ : ७२३ : २७
झरी जामणी : ४१६ : १०
एकूण : ८७१५ : ३६२
अत्यल्प प्रतिसादाचे कारण काय?
जवाहर नवोदय विद्यालयाकडून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना दिली जाते. त्यांच्या माध्यमातून त्या-त्या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जातात. अनेक शिक्षक तर स्वत:हून आपल्या विद्यार्थ्यांना नवोदयची माहिती देऊन प्रोत्साहित करतात. परंतु, यंदा हा उत्साह दिसून येत नाही. आपापल्या शाळांची पटसंख्या टिकविण्यासाठी सर्वांचा प्रयत्न दिसून येत आहे. शिवाय, नवोदय विद्यालयामार्फतही थेट पालकांपर्यंत जाऊन प्रचार झाल्याचे दिसून आले नाही.