आजी-आजोबा झाला का अभ्यास?, उद्या होणार परीक्षा

By अविनाश साबापुरे | Published: March 16, 2024 06:41 PM2024-03-16T18:41:00+5:302024-03-16T18:45:08+5:30

नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे.

Did your grandparents study? The exam will be held tomorrow | आजी-आजोबा झाला का अभ्यास?, उद्या होणार परीक्षा

आजी-आजोबा झाला का अभ्यास?, उद्या होणार परीक्षा

यवतमाळ : नातवंडे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुंतलेले असताना आता प्रौढ निरक्षरांचीही रविवारी परीक्षा घेतली जाणार आहे. नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे. त्यासाठी तीन तासांची लेखी परीक्षा होणार असून जिल्ह्यातील १६ हजार १९९ प्रौढ निरक्षरांची नोंदणी झाली आहे. सोळा तालुक्यातील १०८९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
जिल्ह्याचे योजना शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या अखत्यारित या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. नव भारत साक्षरता अभियानात शाळा हे एकक मानण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शाळेतून उल्लास ॲपवर प्रौढ निरक्षराची नाव नोंदणी करण्यात आली होती, ती शाळाच त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र राहणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.

ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे. 

कोणत्या तालुक्यात किती प्रौढ निरक्षर?
आर्णी : ८४६
बाभूळगाव : ४२६
दारव्हा : ३८२६
दिग्रस : ४६
घाटंजी : ६०४
कळंब : १७७४
महागाव : ६२७
मारेगाव : ६३९
नेर : ६२०
पांढरकवडा : ६८७
पुसद : २८१
राळेगाव : २०७
उमरखेड : १३१९
वणी : ८९५
यवतमाळ : २५९१
झरी : ४८३

अशी असेल प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुणविभागणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक आहे.

सोळाही तालुक्यातील विविध शाळांवर एकंदर १५ हजार ८७१ निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. तर जिल्ह्यातील ३२८ निरक्षरांनी स्वत: उल्लास ॲपवर नोंदणी केली आहे. परीक्षेचे साहित्य गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून केंद्रांवर पोहचविण्यात आले आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, तसेच मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे.
- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ

Web Title: Did your grandparents study? The exam will be held tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.