भोयर घाटात डिझेल टॅंकरला अपघात; स्फोटात एक ठार, दोन जखमी

By सुरेंद्र राऊत | Published: April 29, 2024 01:50 PM2024-04-29T13:50:35+5:302024-04-29T13:53:50+5:30

जंगलाने घेतला पेट : आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Diesel Tanker Accident at Bhoir Ghat; One killed, two injured in the blast | भोयर घाटात डिझेल टॅंकरला अपघात; स्फोटात एक ठार, दोन जखमी

Diesel Tanker Accident at Bhoir Ghat

यवतमाळ :  शहरालगतच्या दारव्हा मार्गावरील भोयर घाटात डिझेल घेऊन जात असलेल्या टॅंकरला अपघात झाला. त्यात डिझेल लिक  होऊन स्फोट झाला. यामध्ये एकाजणाचा जागीच जळून कोळसा झाला. तर दोघे गंभीर जखमी आहे. डिझेल रस्त्यावरून वाहू लागल्याने सर्वत्र आग पसरली. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली. त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. शर्थीचे प्रयत्न करून दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. 


यवतमाळातून दारव्हा येथे डिझेल घेऊन जात असलेला २० हजार किलो लिटरचा टॅंकर भोयर घाटात पलटी झाला. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व टॅंकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात टॅंकरचा कप्पा फुटल्याने डिझेल वाहू लागले. लगेच डिझेलने पेट घेतला. टॅंकरमध्ये असलेले तिघे जण जिवाच्या आकांताने बाहेर पडले. मात्र डिझेल सर्वत्र पसरल्याने मोठा भडका उडाला. यात एकाजणाचा जागीच जळून कोळसा झाला. तर उरलेले दोघे गंभीर अवस्थेत दारव्हाकडे निघून गेले. त्यांच्यावर दारव्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. टॅंकर स्फोटाची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक बंद केली. डिझेल रस्त्यावरून वाहत जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. तसेतसा जंगलानेही पेट घेण्यास सुरुवात केली. घाटाच्या खाली गाव असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाडस दाखवित तातडीने पेट घेतलेल्या टॅंकरवर विशिष्ट फोमचा फवारा सुरू केला. टॅंकर विझल्यानंतर रस्त्याने वाहून जाणाऱ्या पेटत्या डिझेलला विझविण्यात आले. त्यासाठी वाहते डिझेल दगड, माती टाकून ठिकठिकाणी थांबविले. त्यावर फोम व पाणी असा आळीपाळीने फवारा करून आग विझविण्याचे प्रयत्न झाले. आग विझवेपर्यंत आजूबाजूची हिरवी झाडे कोळसा झाली. प्रत्यक्षदर्शीनी दुरुन पाहिलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते असे सांगितले. दुपारपर्यंत दारव्हा मार्गारील वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती. अपघातग्रस्त टॅंकरमध्ये काही कप्प्यात डिझेल भरलेले आहे. आता ते काढायचे कसे व परिस्थिती पूर्ववत कशी करायची यावर यवतमाळ नगरपरिषदेचे अग्नीशमन अधिकारी विनोद खरात व त्यांचे पथक प्रयत्न करीत आहे. घटनास्थळी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रजनिकांत चिलुमुला, ग्रामीण ठाणेदार प्रशांत कावरे, वाहतूक शाखा प्रभारी अजित राठोड यांच्यासह मोठा पोलिस ताफा तैनात होता.

 

Web Title: Diesel Tanker Accident at Bhoir Ghat; One killed, two injured in the blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.