'यवतमाळ-वाशिम'मध्ये मतांचा फरक, निवडणूक आयोगास हायकोर्टची नोटीस

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 31, 2024 05:17 PM2024-05-31T17:17:27+5:302024-05-31T17:19:41+5:30

२६ जूनपर्यंत मागितले उत्तर : उमेदवार अनिल राठोड यांची याचिका

Difference of votes in 'Yavatmal-Washim', High Court notice to Election Commission | 'यवतमाळ-वाशिम'मध्ये मतांचा फरक, निवडणूक आयोगास हायकोर्टची नोटीस

Difference of votes in 'Yavatmal-Washim', High Court notice to Election Commission

नागपूर :यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतांचा फरक आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावून यावर येत्या २६ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात समनक जनता पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या २६ एप्रिल रोजी निवडणूक झाली. त्यात ६२.८७ टक्के म्हणजे १२ लाख २० हजार १८९ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले व भारतीय निवडणूक आयोगाला याचा अहवालही पाठविला. दरम्यान, राठोड यांनी निवडणूक अधिकारी कार्यालयातून वाशिम व राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बुथनिहाय मतदानाची आकडेवारी मिळविली असता २५ मते अधिकची आढळून आली.

निवडणूक अधिकाऱ्यांनी वाशिममधून दोन लाख १५ हजार ९४८ तर, राळेगावमधून एक लाख ९३ हजार ९७३ मतदारांनी मतदान केल्याचे जाहीर केले होते. परंतु, बुथनिहाय आकडेवारीमध्ये वाशिममधून दोन लाख १५ हजार ९५३ तर, राळेगावमधून एक लाख ९३ हजार ९९३ मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येते. वाशिममध्ये पाच तर, राळेगावमध्ये २० मते अधिकची आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील बुथनिहाय मतदानाची चौकशी केल्यास लाखो मतांचा घोळ उघडकीस येऊ शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
 

मतमोजणीला स्थगिती देण्यास नकार
राठोड यांनी यासंदर्भात २९ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी राठोड यांची मुख्य मागणी आहे. तसेच, त्यांनी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीला निवेदनावर निर्णय होतपर्यंत स्थगिती देण्याची विनंतीही केली होती. परंतु, न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ही विनंती मंजूर करण्यास नकार दिला. राठोड यांच्यातर्फे ॲड. मोहन गवई व ॲड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Difference of votes in 'Yavatmal-Washim', High Court notice to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.