यवतमाळ जिल्ह्यातील पाच बीअरबारच्या दारू साठ्यात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 01:47 PM2020-05-15T13:47:56+5:302020-05-15T13:48:40+5:30
लॉकडाऊन काळात दारू विक्री केली जात असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारव्हा रोडवरील पाच बीअरबार आणि एका बीअर शॉपीची तपासणी केली. तेव्हा तेथील दारू साठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे कारवाईसाठी या तपासणीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊन काळात दारू विक्री केली जात असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारव्हा रोडवरील पाच बीअरबार आणि एका बीअर शॉपीची तपासणी केली. तेव्हा तेथील दारू साठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे कारवाईसाठी या तपासणीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
सुमारे ५० दिवसांपासून लॉकडाऊन आहे. दारूची विक्री, वाहतूक पूर्णत: बंद आहे. असे असतानाही पिणाऱ्यांना महागात परंतु सर्रास दारू उपलब्ध होत आहे. जिल्ह्याची सीमा सील आणि बार-वाईन शॉप बंद असताना ही दारू मिळते कोठून असा प्रश्न ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन काही जागरुक नागरिकांनी याच मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारव्हा रोडवरील बीअरबारची तपासणी केली. यामध्ये झुलेलाल प्राईड, नंदिनी, एकवीरा, चेतना, एस. कुमार या बारचा समावेश आहे. याशिवाय लोहारातील ओम बीअर शॉपीचीही तपासणी केली गेली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लॉकडाऊनमुळे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क निरीक्षक, उपनिरीक्षक व दोन कॉन्स्टेबल यांच्या मदतीने दररोज दोन या प्रमाणे बारची ही तपासणी केली गेली. बारच्या तपासणीत तेथे उपलब्ध दारूसाठा व रजिस्टरमधील नोंदी याचा हिशेब जुळविला असता बहुतांश ठिकाणी दारूसाठ्यात तफावत आढळून आली आहे. या तफावतीचा अहवाल १४ मार्चला जिल्हाधिकाºयांकडे सादर केला गेला. त्यावर आता काय कारवाई होते याकडे नजरा लागल्या आहेत. या बारमधील दारू सील करण्यात आली आहे. लॉकडाऊन नंतर बीअरबार उघडतील तेव्हा पुन्हा एक्साईजचा अधिकारी जाऊन दारूचे हे सील तोडेल व नंतरच दारूची विक्री करता येणार आहे.
वाशिममधून यवतमाळात दारू आणण्याचा प्रयत्न नुकताच हाणून पाडला गेला. अशाच पद्धतीने अन्य जिल्ह्यातूनही दारू आणली जात असण्याची शक्यता आहे. सिव्हील लाईनमध्ये पोलीस संरक्षणात आलेली दारू व नंतर दुप्पट दराने त्याची झालेली विक्रीही पुढे आली होती. आता धामणगाव रेल्वे येथून खाकी वर्दीआड दारू आणली जात असल्याचे बोलले जाते.
१९ परवाने कायमस्वरूपी रद्द
लॉकडाऊन काळात एक्साईजच्या तपासणीत तफावत आढळल्याने जिल्हाधिकाºयांनी १९ बीअरबार, वाईन शॉप, शॉपी व गोदामाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. त्यात दहा देशी दारू, पाच बीअरबार, दोन वाईन शॉप, एक बीअर शॉपी व एक ठोक गोडावूनचा समावेश आहे. आता आणखी निलंबन कारवाईची चिन्हे आहेत.
दारु दुकाने न उघडण्यासाठी लिकर लॉबी इंटरेस्टेड
अवैध व्यावसायिकांसाठी लॉकडाऊन सुवर्णसंधी ठरला. दारू, गुटखा, सुगंधित तंबाखू व अन्य प्रतिबंधीत वस्तू वरकमाईचे साधन ठरले आहे. दुप्पट-तिप्पट दराने त्याची विक्री होत आहे. कागदावर परवानाधारकांकडून दारू विक्री बंद असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ती सुरू आहे. लिकर लॉबीतील काही सदस्य ही दारू दुप्पट दराने विकता यावी म्हणून लॉकडाऊन कायम रहावा, परवाना प्राप्त दुकाने उघडली जाऊ नये अशा प्रयत्नात आहे. त्यासाठी वेळप्रसंगी पॉझिटिव्ह रुग्णांचा हवाला देऊन प्रशासनाची दिशाभूलही केली जात आहे. या लॉबीचे राजकीय पाठीराखे सध्या विरोधी बाकावर असल्याने सत्ताधारी मंडळी परवानाप्राप्त दुकाने सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही तासासाठी त्यात यशही आले होते. मात्र वणीत गर्दी झाल्याने पुन्हा दुकाने गुंडाळावी लागली. ही दुकाने गुंडाळण्यासाठी लिकर लॉबीतील काहींनी राजकीय मार्गाने प्रशासकीयस्तरावर मोर्चेबांधणी केली होती, अशी माहिती आहे.
वारको रिजन्सीत जुगारही भरतो !
वाशिममधील दारू तस्करीमुळे प्रकाशझोतात आलेल्या धामणगाव रोड स्थित कॉटन मार्केट चौकातील ‘ओम वारको रिजन्सी’मध्ये जुगारही चालत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ‘मुकरी’ या टोपन नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यावसायिकाने या रिजन्सीमध्ये फ्लॅट घेतला. या फ्लॅटमध्ये चार-पाच दिवस बाहेरच्या लोकांना बोलावून जुगार भरविला गेला. दारु तस्करीतील दोघांनी दोन दिवस तेथे हजेरी लावल्याचे सांगितले जाते. मात्र या जुगाराचा शेजाऱ्यांना त्रास होऊ लागल्याने ‘तूर्त’ हा जुगार बंद करण्यात आला.
बीअरबार व शॉपीच्या निरीक्षणात साठ्यांमध्ये तफावत आढळून आली आहे. त्या संबंधीचे अहवाल प्राप्त झाले असून ते पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले जात आहे. त्यानंतरच नेमकी काय कारवाई केली जाते हे स्पष्ट होईल.
- सुरेंद्र मनपिया
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ.