लाईफ जॅकेट खरेदीत ‘डीआयजीं’ची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:31 AM2018-12-26T05:31:58+5:302018-12-26T05:32:26+5:30
महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेल्या जॅकेटची मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने पोलखोल केली.
- राजेश निस्ताने
यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेल्या जॅकेटची मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने पोलखोल केली. या जॅकेट खरेदीच्या अनुषंगाने अमरावतीचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांची विभागीय चौकशी (डीई) केली जात आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव एस. ए. बगेसवार यांच्यामार्फत ही खातेनिहाय चौकशी होत आहे. सुमारे दहा वर्षांपासून जॅकेट खरेदीचे हे प्रकरण गाजत आहे. श्रीकांत तरवडे त्यावेळी पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) पदावर कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या सुरक्षा जॅकेटची ही खरेदी झाल्याची माहिती आहे. गेली काही वर्ष चौकशीची ही फाईल थंडबस्त्यात होती. परंतु अलिकडे या चौकशीने वेग घेतला आहे.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार तर ८०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. मृतांमध्ये मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अपर पोलीस आयुक्त अशोक कामटे, एनकाऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शिंदे, एनएसजीचे कमांडो अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन, सहायक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, एनएसजीचे जमादार गजेंद्र सिंह तसेच सीएसटीचे तीन रेल्वे कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. करकरे व कामटे यांनी सुरक्षा जॅकेट घातले असतानाही दहशतवाद्यांच्या एके-४७ मधून निघालेल्या गोळीने त्यांचा निशाणा साधला आणि तेथेच या सुरक्षा जॅकेटच्या दर्जा व गुणवत्तेची पोलखोल झाली.