जिल्ह्यात डिजिटल इंडिया सप्ताहाला प्रारंभ
By admin | Published: July 3, 2015 12:22 AM2015-07-03T00:22:22+5:302015-07-03T00:22:22+5:30
केंद्र शासनाने संपूर्ण भारतात १ ते ७ जुलै हा डिजिटल इंडिया सप्ताह पाळल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून भारत संचार निगम लिमिटेड यवतमाळ..
यवतमाळ : केंद्र शासनाने संपूर्ण भारतात १ ते ७ जुलै हा डिजिटल इंडिया सप्ताह पाळल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून भारत संचार निगम लिमिटेड यवतमाळ जिल्ह्यातही डिजिटल इंडिया सप्ताह राबवित असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वरिष्ठ व्यवस्थापक अजय सावतकर यांनी दिली.
भारत जगातील सध्या मोठे मार्केट असून सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात आपल्या कंपनीचे उत्पादन करीत असून भारतातील तज्ज्ञ वेगवेगळ्या देशात या क्षेत्रात काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु अद्यापही भारतातील तळागाळातील जनतेपर्यंत डिजिटलायझेशन पोहोचल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्या लोकांनाही या प्रवाहात आणण्यासाठी या सप्ताहात प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
बीएसएनएलकडून भारतातील प्रत्येक कोपऱ्यात आज कनेक्टीव्हीटी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात देशातील एक लाख २० हजार ग्रामपंचायतींमध्ये येत्या काळात डिजिटायलेझेशनने जोडायचे असून यवतमाळ जिल्ह्यातही कळंब, बाभूळगाव, नेर, झरीजामणी या चार तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात २३३ ग्रामपंचायती जोडण्याचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आॅप्टीकल फायबर कनेक्टीव्हीटीने या जोडण्यात येवून त्यानंतर त्या मुंबईला असलेल्या शासनाच्या सर्व्हरला कनेक्ट होतील आणि सर्व शासकीय कार्यालयांशी त्या कनेक्ट राहतील. यासह विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेसाठी १०७७ हा क्रमांक आकस्मिक सेवेसाठी उपलब्ध करून दिला असून तो २४ तास सुरू असतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पत्रपरिषदेला बीएसएनएलचे सहाय्यक व्यवस्थापक विजय धामणीकर, अशोक बंडे, माणिक पुरचुले, संतोष गादिया, शंतनू शेटे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)