कापूस खरेदीसाठी डिजिटल सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:22 PM2020-01-16T12:22:15+5:302020-01-16T12:23:13+5:30

कापूस खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा राज्यातील ४० कापूस संकलन केंद्रात सुरू करण्यात आला.

Digital Systems for Cotton Shopping | कापूस खरेदीसाठी डिजिटल सिस्टीम

कापूस खरेदीसाठी डिजिटल सिस्टीम

googlenewsNext
ठळक मुद्देआधार नंबर, कापसाचा धागा, प्रतवारी कळणार४० संकलन केंद्र ऑनलाईन

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कापूस खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा राज्यातील ४० कापूस संकलन केंद्रात सुरू करण्यात आला. यामुळे कापूस विक्रीकरिता आणणाऱ्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्यूआर कोडने स्कॅन होईल. सोबतच कापसाचा धागा, त्याची प्रतवारी ऑनलाईन पद्धतीने थेट केंद्रावरून जाणून घेता येणार आहे.
कापूस खरेदी आता डीजिटल केली जाणार आहे. त्यासाठी आॅनलाईन पद्धत अवलंबली जाणार आहे. या माध्यमातून खरेदीत पारदर्शकता आणण्यासोबतच गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील ९८ कापूस संकलन केंद्रावर पणन महासंघाने आत्तापर्यंत तब्बल १९ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यातील एक हजार कोटींचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. ४५ कोटींचे चुकारे अद्याप प्रक्रियेत आहेत.
कापूस संकलनासाठी राज्यातील सर्व केंद्रावर युद्ध पातळीवर प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अधिक प्रभावशाली आणि पारदर्शक करण्यावरही भर दिला जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प््यात राज्यातील ४० संकलन केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने कापूस खरेदी केली जात आहे. यापूर्वी कापूस विक्रीकरिता आणताना शेतकऱ्यांचा सातबारा, बँक पासबुक, आयएफसी कोड, आधारकार्ड लागत होते. आता केवळ चुकारे अदा करताना शेतकऱ्यांचा आधार नंबर बँकेत द्यावा लागणार आहे. या आधारबेस नंबरवर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केले जाणार आहे. यात प्रारंभी केवळ १ रूपयाचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला जाईल. हे पैसे नेमके कुणाच्या खात्यात वळते झाले, याची शहानिशा झाल्यानंतर उर्वरित चुकारा शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला जाईल. आधार नंबर आणि सातबारा वेगळा असेल, तर चुकारे वळते होणे तत्काळ थांबणार आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. तसेच विलंबाने चुकारे बँक खात्यात जमा होण्याचे प्रकारही कमी होण्याची शक्यता आहे.
आधार नंबर चुकू नये म्हणून आधार क्रमांकावरील क्यूआरकोड स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण डाटा ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. सोबतच खरेदीची व चुकाऱ्यांची गती वाढण्यास मदत होईल. खरेदी झालेल्या कापसाची प्रत कशी आहे, त्याचा धागा कसा आहे, ही संपूर्ण माहिती केंद्रापर्यंत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

आत्तापर्यंत साडेचार लाख कापूस गाठींची निर्मिती करण्यात आली. ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केले जात आहे. ही प्रक्रिया अधिक वेगवान पद्धतीने राबविण्यासाठी खरेदी प्रक्रियेत आधार नंबरची प्रक्रिया राबविली जात आहे.
- जयेश महाजन
व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ

Web Title: Digital Systems for Cotton Shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती