दिग्रसचे धरण ठरतेय मृत्यूचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:00 AM2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:06+5:30
नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.
प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले नांदगव्हाण व अरुणावती धरण मृत्यूचे केंद्र ठरत आहे. गेल्या काही दिवसात या धरणात पडून अनेकांचे बळी गेले आहे.
नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.
धरणावर संबंधित विभागाने कोणतीच सुरक्षा व्यवस्था उभारली नाही. यावर्षी पावसामुळे नांदगव्हाण धरण ओव्हरफ्लो झाले. अरुणावती धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. धरणाचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी अनेकजण भेटी देतात. मात्र त्यापैकी काही जण घरी परत पोहोचू शकत नाही. आतापर्यंत स्टंटबाजीच्या नादात काहींचा जीव गेला. तरीही सुरक्षात्मक पावले उचलण्यात आली नाही.
प्रेमी युगुलांसाठी नंदनवन
नांदगव्हाण व अरुणावती धरणाचे ठिकाण म्हणजे प्रेमी युगुलांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यांची नेहमी या परिसरात रेलचेल असते. त्यातूनही अनेक अघटित घटना घडतात. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी किमान प्रवेशद्वारावर सुरक्षा यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. दोन्ही धरणांवर लहान मुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. त्यातूनही अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.