दिग्रसचे जय राठोड यांचा ‘वर्ल्ड पीस ट्री ॲडव्होकेट’ने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:42 AM2021-04-16T04:42:20+5:302021-04-16T04:42:20+5:30
गेल्या एक दशकापासून पर्यावरण चळवळीत जय राठोड हा तरुण कार्यरत आहे. आपल्या अभिनव उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी ते कायम झटताना ...
गेल्या एक दशकापासून पर्यावरण चळवळीत जय राठोड हा तरुण कार्यरत आहे. आपल्या अभिनव उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी ते कायम झटताना दिसतात. वृक्षारोपणासाठी सीड्स बॉल, सीड्स बँक, सीड्स बॉल कार्यशाळा, तर उन्हाळ्यात पक्षांची तृष्णा भागवून त्यांचा जीव वाचावा म्हणून सेल्फी विथ पक्षी पाणपोई, राघू-मैना रेस्टॉरंट, बुलबुल पाणपोई, निःशुल्क कृत्रिम घरटे व जलपात्र वाटप, पक्षी वाचवा जनजागृती, असे अभियान ते दरवर्षी राबवितात.
जय राठोड जल रक्षणासाठी जलसेल्फी मोहीम, अर्धा ग्लास पाणी उपक्रम, रेन वाॅटर हार्वेस्टिंग असे विधायक उपक्रमदेखील राबवित आहे. आजवर हजारो सीड्स बॉल स्वखर्चाने तयार करून त्यांनी जंगल, माळरानात टाकले. दुसऱ्यांचा वाढदिवस असो की समारंभ, अशा कार्यक्रमात राठोड पुष्पगुच्छ देण्याऐवजी एक झाड विकत घेऊन देतात. त्यांच्यामुळेच आज हजारो पक्षीमित्र आणि पर्यावरणप्रेमी तयार झाले आहेत. ‘आधी केले, मग सांगितले’, या तत्त्वाचे पूजक असलेले जय राठोड हे सच्चे पर्यावरणप्रेमी आहेत.
बॉक्स
केवळ छायाचित्रापुरते काम नाही
केवळ फोटोसेशनपुरते जय राठोड यांचे कार्य नाही. त्यामुळेच जागतिक पर्यावरण चळवळीने त्यांचा गौरव केला आहे. इंडोनेशिया देशातील माउंट सिंदूर येथे आयोजित ५१ व्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘आंतरराष्ट्रीय आई वसुंधरा दिनानिमित्त सहभाग आणि योगदानासाठी त्यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले. पर्यावरण चळवळीच्या आंतरराष्ट्रीय संचालक प्रिन्सेस नताशा देमात्रा, प्रिन्स डॅमियन देमात्रा, डॉ. काकोली घोष यांना ते यशाचे श्रेय देतात. स्थानिक पातळीवर व देश-विदेशातून त्यांचे कौतुक होत आहे.