घाणीच्या साम्राज्यामुळे दिग्रसकर वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:50 AM2021-09-17T04:50:12+5:302021-09-17T04:50:12+5:30
प्रकाश सातघरे फोटो दिग्रस : शहर घंटीबाबा यांच्या पावन वास्तव्याने पवित्र झाले आहे. मात्र, पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे सध्या ...
प्रकाश सातघरे
फोटो
दिग्रस : शहर घंटीबाबा यांच्या पावन वास्तव्याने पवित्र झाले आहे. मात्र, पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. शंकरनगर, विठ्ठलनगर, गवळीपुरा, संभाजी नगरसह अनेक नगरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अनेक नगरामध्ये नाल्या नाहीत. जेथे आहे, तेथे टूट-फूट झाली आहे. नाल्यांचे निकृष्ट दर्जाचे काम केवळ कमिशन पोटी करण्यात आले. केवळ खड्डे आहे. अनेक नगरात नाल्याचे पाणी घरात शिरते. याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. काही नगरात रस्ते नसून जेथे रस्ते आहे, त्या रस्त्यावर पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर २ ते ३ फुटांचे मोठे खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी १० फुटांचा रस्ता असून दोन्हीही बाजूंनी नाली आहे. त्या नाल्या दोन-दोन फूट फुटल्या आहे. सहा फुटांच्या रस्त्यावरून नागरिकांना जाणे-येणे करावे लागत आहे.
अनेक नगरांमध्ये कुठल्याही मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
१ रस्त्यावर भरतो आठवडे बाजार
येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. यासाठी नियोजित जागा नसल्यामुळे दिग्रस ते आर्णी रस्त्यावर शिवाजी चौकात बाजार भरतो. त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याकडे नगरपरिषदेला लक्ष देण्यास वेळ नाही. पार्किंगची ही व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी ठेवली जातात.
२ सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता गृह नाही
मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौक, शंकर टाॅकीज, जुने बसस्थानक आदी परिसरात स्वच्छता गृह व मुत्रीघराची व्यवस्था नाही. त्यामुळे महिला व नागरिकांना उघड्यावर जावे लागते. स्वच्छता गृह व मुत्रीघराची मागणी अनेकदा नागरिकांनी केली. परंतु नगरपरिषदेने लक्ष दिले नाही.
३ नाल्यांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष, कचरा डेपोचा अभाव
येथे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याठिकाणी कचरा डेपो तयार करण्यात आला नाही. सध्या दिग्रस ते आर्णी रस्त्यावर कचरा फेकणे सुरू आहे.
४ ९५२ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण
नगरपरिषद अंतर्गत ९५२ घरकूल बांधकाम करण्यात आले होते. परंतु १६ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा नगरपरिषदेच्या कमिशन खोरीमुळे व दुर्लक्षित धोरणामुळे एकही घरकूल पूर्ण झाले नाही. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे स्वप्न अधुरेच राहिले. केवळ रमाई आवास योजनेचे घरकूल पूर्ण झाले आहे. काहींना दोन ते तीन हप्ते मिळाले. उर्वरित हप्ते बाकी आहे. यासाठी त्यांना उपोषणही करावे लागले होते. मात्र अद्याप घरकुलाचा प्रश्न सुटला नाही.
५ रस्ते उखडल्याने होतोय त्रास
शहरातील अनेक भागातील रस्ते उखडल्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्रास होत आहे. गल्लीबोळातील रस्ते नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. बांधकाम करणारे नागरिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. कुठे चांगले रस्ते खोदून सिमेंट रस्ते बनविले. नंतर सिमेंट रस्ते खोदून चकर बसविली. आता चकर काढून पुन्हा सिमेंट रस्ता तयार केला.
६ मुख्य रस्त्यावर जनावरांचा ठिय्या शिवाजी चौक, मानोरा चौक, शंकर टाॅकीज परिसर इतर भागात मोकाट जनावरांचे कळप हिंडतात . ते ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना त्रास होतो. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद असमर्थ असल्याचे दिसू येत आहे.