दिलीपकुमार जिंकून गेले यवतमाळवासीयांचेही मन..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 05:00 AM2021-07-08T05:00:00+5:302021-07-08T05:00:11+5:30
दिलीपसाहेबांची आज ‘एक्झिट’ झालेली असतानाही त्यांची ४१ वर्षांपूर्वीची यवतमाळातील ‘एन्ट्री’ संस्मरणीय ठरली. १९८० मधील तो २५ डिसेंबरचा दिवस होता. हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाने अखिल भारतीय सुवर्णपदक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माजी खासदार विजय दर्डा यांनी दिलीपकुमार यांना आमंत्रित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक दिलीपकुमार यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला आणि साऱ्या देशातील चाहते हळहळले. मात्र, जग जिंकणाऱ्या या अभिनेत्याने ४१ वर्षांपूर्वी यवतमाळात येऊन अवघ्या जिल्हावासीयांचे हृदय काबीज केले होते. पडद्यावर आवडलेला हा हीरो तेव्हा माणूस म्हणूनही किती ग्रेट आहे, याचा जिताजागता अनुभव जिल्ह्याने घेतला होता.
दिलीपसाहेबांची आज ‘एक्झिट’ झालेली असतानाही त्यांची ४१ वर्षांपूर्वीची यवतमाळातील ‘एन्ट्री’ संस्मरणीय ठरली. १९८० मधील तो २५ डिसेंबरचा दिवस होता. हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाने अखिल भारतीय सुवर्णपदक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माजी खासदार विजय दर्डा यांनी दिलीपकुमार यांना आमंत्रित केले होते.
खरे म्हणजे, दिलीपकुमार विदर्भात फारसे आले नाहीत. ते नागपूरव्यतिरिक्त इतर कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात आल्याचे ऐकिवात नाही. नागपूर येथील एनकेपी साळवे यांच्याशी त्यांची निकट मैत्री होती. त्यानंतर नामांकित विधिज्ञ ॲड. हरीश साळवे यांच्याशीही त्यांचे निकट संबंध राहिले.
दर्डा कुटुंबीयांमुळे मात्र दिलीपकुमार यांना १९८० मध्ये यवतमाळात प्रत्यक्ष येण्याचा योग आला. या कबड्डीच्या सामान्याला त्यांच्यासह तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री शिवराज पाटीलही उपस्थित होते. विजय दर्डा यांचे मित्र श्याम दुनोदवाला यांच्यासोबत ते नागपूरमार्गे यवतमाळात आले. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी, मातोश्री वीणादेवी दर्डा, सुरेश दादा जैन, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, किशोर दर्डा, कीर्ती गांधी, तसेच हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवघ्या यवतमाळकरांतर्फे दिलीपकुमारांचे स्वागत केले. ही भेट अविस्मरणीय ठरली.
आझाद मैदानात उलटला जनसागर
- कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा यवतमाळच्या आझाद मैदानात होता. या कार्यक्रमात दिलीपकुमारांनी केलेले ओघवत्या हिंदीतील भाषण म्हणजे चाहत्यांसाठी अनोखी मेजवानीच होती. दिलीपसाहेबांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘माइल स्टोन’ असलेले दिलीपकुमार यवतमाळकरांनी प्रत्यक्ष पाहिले, अशी प्रतिक्रिया या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालक ॲड. प्रवीण जानी यांनी व्यक्त केली.
व्हीआयपी नव्हे, दिलखुलास माणूस
- यवतमाळात आल्यावर दिलीपकुमार यांनी आपण अतिविशिष्ट व्यक्ती आहोत, असे मानून स्वत:ला गर्दीपासून दूर ठेवले नाही. एखाद्या सुरक्षित खोलीत एकांतवासात बसण्यापेक्षा त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आवर्जून भेट स्वीकारली. दिलखुलास हस्तांदोलन केले. भेटायला आलेले क्रीडाप्रेमी, नगर परिषद व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, चाहत्यांशी त्यांनी मोकळी चर्चा केली. क्रीडाप्रेमींकडून कबड्डी सामन्यांचे स्वरूप समजून घेतले. ‘लोकमत’च्या कार्याची व व्याप्तीची प्रशंसा केली.