तालुका, जिल्हा गटात थेट लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:00 AM2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:02+5:30

एक हजार कोटींचे भागभांडवल असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. १३ वर्षांपासून या बँकेवर एकच संचालक मंडळ कायम होते. आता या बँकेची निवडणूक होत आहे. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीन पक्ष महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शेतकरी सहकारी विकास आघाडी या पॅनलने दंड थोपटले आहे.

Direct fight in taluka, district group | तालुका, जिल्हा गटात थेट लढती

तालुका, जिल्हा गटात थेट लढती

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा बॅंक निवडणूक : सहकारी संस्था जिल्हा गटात मात्र पंचरंगी लढत

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांसाठी सोमवार २१ डिसेंबर रोजी मतदान घेतले जात आहे. तालुका व जिल्हा गटात महाविकास आघाडी आणि शेतकरी सहकार विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये बहुतांश थेट लढती होत आहे.  जिल्हा गटातील सर्व सहकारी संस्था मतदारसंघात तब्बल दहा उमेदवार असून त्यातील सहा दखलपात्र असल्याचे सांगितले जाते. 
एक हजार कोटींचे भागभांडवल असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. १३ वर्षांपासून या बँकेवर एकच संचालक मंडळ कायम होते. आता या बँकेची निवडणूक होत आहे. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीन पक्ष महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शेतकरी सहकारी विकास आघाडी या पॅनलने दंड थोपटले आहे. या पॅनलमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष अशा सर्वच पक्षांचे उमेदवार असल्याने पक्षाचे नेमके अधिकृत पॅनल कोणते याबाबत मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती पाहायला मिळते. त्यातच महाविकास आघाडीत अध्यक्ष पदाच्या दावेदार उमेदवारांमधून लाथाड्या पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष पदाचे हे इच्छुक स्पर्धकाच्या पतंगाची दोर मतदानापूर्वीच कापण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी छुपा अजेंडा राबविला जात आहे. त्यामुळे नेमका कोण कुणाचा प्रचार करतोय, कोण कुणासाठी मत मागतोय याचा संभ्रम मतदारांमध्ये पाहायला मिळतो. त्यातही आपल्यापुरते एकच मत मागणाऱ्यांची संख्या अधिक दिसते. 
पक्षनिष्ठा, संबंध की पैसा ?
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘उलाढाल’ होत आहे. त्यामुळे मतदार पक्षनिष्ठा, उमेदवाराशी असलेल्या संबंधांना जागतात की, पैशाला अधिक किंमत देऊन विरोधी गटाला ताकद देतात हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. वणी, मारेगाव, झरी, घाटंजी, कळंब, बाभूळगाव, यवतमाळ, नेर, दिग्रस, महागाव (व्हीजेएनटी), आर्णी (ओबीसी) येथे थेट लढत होणार आहे. पांढरकवडा येथे कालपर्यंत पाठिंबा जाहीर करणारा उमेदवार अचानक मते मागायला निघाल्याने मतदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो. यामागे ‘अर्थ’कारण असल्याचे बोलले जाते.  दारव्हा तालुका गटात तीन उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, तेथे प्रमुख पॅनलच्या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. राळेगावमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार ॲड. प्रफुल्ल मानकर नागपूर उच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयाने निवडणूक रिंगणातून आणि मतदानाच्या अधिकारातून बाद झाले आहेत. तेथे आता दोन महिलांसह तीन उमेदवार रिंगणात आहेत. यातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आणि शेतकरी विकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत खासगीत वेगवेगळे दावे केेले जात असल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे.  पुसद व उमरखेड या तालुका गटाच्या जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, तेथील मतदारांना जिल्हा गटासाठी आरक्षित जागांच्या उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. 
एकूण सर्वच तालुका गटांत थेट लढती होत आहेत. मतदारसंख्या अगदीच कमी असल्याने प्रत्येक मतदारावर विशेष लक्ष ठेवून तेवढीच काळजीही घेतली जात आहे. यवतमाळातील मतदारांना पांढरकवडा रोडवरील फार्म हाऊसवर शिप्ट करण्यात आले आहे. काहींनी आपल्या मतदारांना सुरक्षेच्या कारणावरून देवदर्शनाला पाठविले आहे. बँकेच्या या निवडणुकीत तालुका गटात मोठ्या प्रमाणात ‘उलाढाल’ होत आहे. आर्थिकदृष्ट्या भक्कम उमेदवारांकडे मतदार केवळ ‘अर्थ’कारणामुळे निष्ठा बाजूला ठेवून खेचले जाण्याची शक्यता आहे. 
जिल्हा गटात दोन महिलांना संचालक म्हणून निवडून द्यायचे आहे. तेथेही थेट लढत होत आहे. 
एकूण मतदार ११७५ : तालुका ६००, जिल्हा गट ५७५ 
 जिल्हा बँकेच्या तालुका गटांमध्ये मतदारांची संख्या ६०० आहे, तर जिल्हा गटात ५७५ मतदार आहेत. जिल्हा गटाच्या महिला, ओबीसी, व्हीजेएनटी, एससी-एसटी या आरक्षणाच्या जागांसाठी सर्व ११७५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झरी येथील दोन मतदारांची संख्या कमी झाल्याने कालपर्यंत एका गटाचे जड वाटणारे पारडे आता हलके झाल्याचे मानले जाते. मतदार कमी झाल्याने दुसऱ्या गटाला फायदा होईल, असा अंदाज आहे.

सर्वच तालुक्यात रस्सीखेच 
 अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात थेट लढत आहे. मात्र, जिल्हा गटातील आरक्षणाच्या या जागा वगळता प्राथमिक शेतकरी संस्था वगळून अर्थात सर्व सहकारी संस्था मतदारसंघात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. 
 दोन्ही पॅनलचे समन्वयक या मतदारसंघात आमनेसामने आहेत. यातील एक नागरी पतसंस्थेचे तर दुसरे कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत.  एकूण दहा उमेदवार रिंगणात असून त्यातील सहा दखलपात्र ठरले आहेत. 
 इतर काही उमेदवारांचा मतांच्या विभागणीसाठी वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना पंचरंगी दिसत असला तरी प्रमुख दोन समन्वयकांमध्येच ही लढत होईल, असे मानले जाते. 
 

Web Title: Direct fight in taluka, district group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक