निळोणा येथे होणार शेतीमालाची थेट विक्री
By admin | Published: March 17, 2016 03:11 AM2016-03-17T03:11:14+5:302016-03-17T03:11:14+5:30
शहरानजीकच्या निळोणा प्रकल्पाजवळ रविवार, २० मार्च रोजी शेतीमालाची शेतकऱ्यांकडून थेट विक्री होणार आहे.
प्लास्टिक फ्री उपक्रम : अधिकारी, पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी
यवतमाळ : शहरानजीकच्या निळोणा प्रकल्पाजवळ रविवार, २० मार्च रोजी शेतीमालाची शेतकऱ्यांकडून थेट विक्री होणार आहे. यामध्ये विविध दर्जेदार वस्तू व पदार्थांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे या वस्तू व पदार्थ खेरदी करण्यासाठी यावेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एकप्रकारे पर्वणीच राहणार आहे. उल्लेखनीय म्हणजे यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग पूर्णपणे टाळण्यात येऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेशही देण्यात येईल.
शेतकऱ्यांचे मनोर्धेर्य उंचाविण्यासाठी सध्या जिल्ह्यात शासनाकडून बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हाभरात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोबतच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी विविध स्त्रोत त्यांना माहिती व्हावे, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध संस्था यांच्यामध्ये थेट संपर्क निर्माण होऊन शेतकऱ्यांना एक मोठा ग्राहकवर्ग मिळावा, ग्राहकांना चांगला, ताजा व कमी भावात शेतीमाल, भाजीपाला तसेच शेतीशी निगडित दुग्धजन्य पदार्थ व इतर वस्तू उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्यातूनच जिल्हा प्रशासनाने प्रत्येक शाळेत अशाप्रकारे शेतीमालाचे स्टॉल लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला ग्राहकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे या पुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. शिवाय विविध संस्थांच्या माध्यमातून अशाप्रकारचा उपक्रम इतरत्रही राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रयास या संस्थेने पुढाकार घेऊन निळोणा येथे शेतकरी व ग्राहकांचा थेट समन्वय घडवून आणण्याचा बेत आखला आहे.
नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी रविवारी येथील पोस्टल ग्राऊंडवरून जलदिंडी काढण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळला जावा, पाण्याची बचत करावी यादृष्टीने जागृती केली जाणार आहे.
या दिंडीचा निळोणा प्रकल्पावर समारोप होणार आहे. या दिंडीत अधिकारी, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी असे हजारोंच्या घरात नागरिकांची निळोणा येथे उपस्थिती राहील. या सर्व नागरिकांना ताजा, स्वस्त व थेट भाजीपाला, शेतीपूरक विविध पदार्थ, सायाबीनपासून बनविण्यात आलेले पदार्थ उपलब्ध राहतील. ग्राहकांना थेट शेतकऱ्यांपासून हे पदार्थ खरेदी करण्याचे समाधान मिळणार आहे. या ठिकाणी उपलब्ध राहून नागरिकांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व प्रयास संस्थेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)