वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:44 PM2018-12-28T23:44:04+5:302018-12-28T23:44:49+5:30

शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे.

The dirty water in the colonies is in the river Nirguda | वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत

वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : पात्राची झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. या नदीत चक्क नागरी वसाहतीतील अतिशय घाण पाणी सोडले जात असल्याने पात्र दूषित झाले आहे.
गरजेनुसार आजही काही प्रमाणात शहरात वितरण करण्यासाठी या नदीचे पाणी घेतले जात आहे. नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांत गंभीर आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मात्र या केंद्रात खरोखरच पाण्याचे शुद्धीकरण होते काय, हा संशोधनाचा विषय आहे. शहरातील दामले फैलभागातून नालिद्वारे मोठ्या प्रमाणावर घाण पाणी नदीत सोडले जात आहे. १५ दिवसांपासून नवरगाव धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले होते. परंतु आता नदीची जलपातळी घटल्याने पात्राची स्थिती विदारक झाली आहे. वणी शहरवासियांची तहान निर्गुडा नदीवरच निर्भर असताना, सन २०१६ मध्ये वेकोलिच्यावतीने यंत्राद्वारे नदी पात्रात सफाई अभियान राबविण्यात आले होते. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. पुढे नदीच्या उद्धारासाठी निर्मल निर्गुडा मिशन राबविण्यात आले. लोकसहभागातून नदी स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेच्या पुढाकारात विविध संघटना व राजकीय पुढारी पुढे आलेत. यातून नदीचे पात्र मोठे करण्यात आले खरे, पण ज्या खडकामुळे नदी स्वच्छ रहायची, तो घाटच उद्ध्वस्त करण्यात आला. या मोहिमेवर २० लाख ४० हजार रुपयांचा खर्च झाला. उर्वरित कामे शासनाकडूनही केल्या जाणार असल्याच्या अफवा त्यावेळी पसरविण्यात आल्या. मात्र तसे काहीही घडले नाही. परिणामी नदीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नदी पार करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदी पात्रात दुतर्फा प्रचंड घाण साचली आहे. विसर्जनानिमित्त बांधण्यात आलेला तात्पुरत्या बांधाचा मलबा अद्यापही नदीत पडून आहे. ते काढण्याचा विसर पालिकेला पडला आहे.
वाळूची खुलेआम चोरी
यंदा पावसाळ्यात निर्गुडा नदीला दोनवेळा मोठे पूर आलेत. त्यामुळे नदीत वाळूदेखील मोठ्या प्रमाणावर आली. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गणेशपूर पुलाच्या दोन्ही बाजुच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम वाळूची चोरी केली जात आहे. तीन चाकी गाडीतून ही रेती नेली जात आहे. महसूल विभाग मात्र अद्यापही या विषयात अनभिज्ञ आहे.

Web Title: The dirty water in the colonies is in the river Nirguda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.