विरोधी नगरसेवकांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:18 PM2018-12-06T21:18:20+5:302018-12-06T21:19:49+5:30
येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला.
नगरपरिषदेने २०१८-१९ ते २०२२-२३ या चार वर्षांसाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तब्बल तीन ते चारपट मालमत्ता कर वाढवून नागरिकांना वेठीस धरले. ही करवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करीत विरोधी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा निषेध नोंदविला.
पालिकेने आगामी चार वर्षांसाठी मालमत्ता करवाढ करताना नागरिकांचा विचार केला नाही. करवाढीसाठी जानेवारीमध्ये सभा झाली होती. त्यात विरोधकांनी केवळ दहा ते १५ टक्के करवाढ करण्याची सूचना केली होती. मात्र प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी ३० टक्के करवाढ करून जनतेवर अन्याय केल्याचा आरोप भाजपा गटनेते निखिल चिद्दरवार यांनी केला. भरमसाठ मालमत्ता करवाढीचे सूचनापत्र नागरिकांपर्यंत पोहोचल्याने आता त्यांच्यातही संताप व्यक्त केला जात आहे.
प्रस्तावित करवाढीवर आक्षेप नोंदविण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. बुधवार ही आक्षेपासाठी शेवटचा दिवस होता. तब्बल १५ हजारांवर नागरिकांनी आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे. या वाढीविरोधात गुरुवारी विरोधकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून संताप व्यक्त केला. पालिका सभागृहाबाहेर विरोधकांनी करवाढीविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
विशेष सभेची मागणी
विरोधकांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत विशेष सभा बोलावून करवाढ कमी करण्याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. निखिल चिद्दरवार, निळकंठ पाटील, निरज पवार, उमाकांत पापीनवार आदींनी विशेष सभेची मागणी रेटून धरली. मात्र त्याला मंजुरी मिळत नसल्याचे दिसताच विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधाºयांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.