दुहेरी हत्याकांडाचा तपास गुंडाळला; चर्चा दहा किलो सोन्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:49 AM2023-09-11T10:49:34+5:302023-09-11T10:51:00+5:30
रेकॉर्डवर नकली सोने : पोलिसांनी घाईगडबडीत तपास गुंडाळल्याचा सूर
यवतमाळ : तळेगाव लगत असलेल्या सज्जनगड येथील बाबा जडीबुटीचे उपचार व इतर धार्मिक कारणाने परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान बनले होते. या ठिकाणी २९ ऑगस्टच्या रात्री बाबाची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या सेवेकरी महिलेलाही ठार केले गेले. दहा किलो सोन्यासाठी हे हत्याकांड घडल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस तपासात मात्र नकली सोने आरोपीकडून मिळाले. त्यामुळे हात तपास घाईगडबडीत तर गुंडाळला नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.
लक्ष्मण चंपतराव शेंडे (९०) हे गेल्या काही वर्षांपासून तळेगाव भारी शिवारातील एका टेकड्यावर झोपडीवजा घर बांधून राहत होते. नंतर या टेकड्याला सज्जनगड असे संबोधले जाऊ लागले. लक्ष्मण शेंडे परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक औषधी देऊन उपचार करीत होते. बाबांच्या उपचारांमुळे ठणठणीत बरी झालेली पुष्पा बापुरावजी होले (७६) ही महिला त्यांच्या सेवेत राहू लागली. या ठिकाणी पूजापाठ नेहमी चालत होता. महालक्ष्मी उत्सवही जोरात साजरा केला जात होता.
बाबांजवळ मोठे धन व भरपूर सोने आहे, असा परिसरात समज होता. त्यामुळेच या परिसरात बाबाच्या शब्दाला एक प्रकारची मान्यता होती. शरीर थकलेले असल्याने स्वयंपाक, झाडपूस यासाठी गडावर नोकर ठेवण्यात आले होते. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता लक्ष्मण शेंडे व त्यांची सेवेकरी पुष्पा होले या दोघांची हत्या झाल्याचे आढळून आले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आशिष ज्ञानेश्वर लिल्हारे (२२) रा. खानगाव याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने खुनाचा गुन्हा कबूल करीत शुभम सुभाष बैठवार, सुरज सुभाष बैठवार आणि अशोक पांडुरंग भगत (५१) यांना सोबत घेऊन हे हत्याकांड केल्याचे सांगितले.
लक्ष्मण शेंडे यांच्याकडे मोठी रक्कम व भरपूर सोने आहे, ते मिळविण्यासाठीच हत्या केल्याचे कबूल केले. प्रत्यक्षात मात्र आरोपींच्या हाती बनावट सोने व २६ हजार रुपये रोख इतकीच रक्कम लागल्याचे पोलिस रेकॉर्डवर आले आहे. या आरोपींची पोलिस कोठडी घेऊनही फार काही हाती लागले नाही. या उलट लक्ष्मण शेंडे याचे नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थांमध्ये या हत्याकांडात मोठी रक्कम व सोने चोरी गेल्याची चर्चा आजही सुरू आहे. पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा तपास घाईगडबडीत का गुंडाळला असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
वास्तव सांगणारी व्यक्ती नसल्याने अडचण
लक्ष्मण शेंडे यांच्याकडे नेमका ऐवज किती होता याचे वास्तव सांगणारे कुणीच पुढे आलेले नाही. यामुळे आरोपींनी कबुलीत दिलेला मुद्देमाल ग्राह्य धरून तपास करण्यात आला.