जलजन्य आजारांचे थैमान

By admin | Published: July 26, 2016 12:02 AM2016-07-26T00:02:10+5:302016-07-26T00:02:10+5:30

जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांच्या विरोधात छेडखानीची तक्रार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखल केली.

Disease of waterborne diseases | जलजन्य आजारांचे थैमान

जलजन्य आजारांचे थैमान

Next

तिघांचा गॅस्ट्रोने मृत्यू : शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल, आरोग्य यंत्रणा सतर्क 
आरोग्य यंत्रणेत सावळा गोंधळ
जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांच्या विरोधात छेडखानीची तक्रार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखल केली. त्यापूर्वीच आरोग्य कर्मचारी आंदोलन करीत होते. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही रोष होता. ही सर्व स्थिती ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झाली. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही गेल्या काही दिवसांपासून अधिष्ठाताविरोधात विभाग प्रमुख असे शीतयुद्ध सुरू आहे. येथील औषधशास्त्र विभाग प्रमुखसुद्धा यामुळेच वैद्यकीय रजेवर गेले आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम थेट सर्वसामान्य रुग्णांवर होत आहे. जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी डॉ. सुरेश तरोडेकर यांच्या बदलीने जागा रिक्त आहे. या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. तंत्रज्ञाकडे प्रभार सोपवून कामकाज सुरू आहे.

यवतमाळ : दमदार पावसासोबतच निर्माण झालेल्या दूषित जलस्रोताने जिल्ह्यात जलजन्य आणि साथीच्या आजाराचा उद्रेक झाला आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची चिकार गर्दी झाली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असून हगवण, ताप, उलटी आदींचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान जिल्ह्यात महिनाभरात गॅस्ट्रोमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
गत तीन वर्षानंतर यंदा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्यातच वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस कोसळला आहे. नदी, नाल्यांसह सर्व जलस्रोतात तुडुंब पाणी भरले आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत अद्यापही निर्जंतुक करण्यात आले नाही. त्यासोबतच शेतशिवारात जाणारे मजूर मिळेल तेथील पाणी प्राशन करीत आहे. दूषित पाण्यातून जलजन्य आजार होण्याचा धोका वाढला आहे. हगवण, उलटी आणि ताप हे तीन लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण होते. याशिवाय डायरिया, कॉलरा, कावीळ आणि टायफाईडचे रुग्णही येत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.टी.जी. धोटे यांनी जिल्ह्यातील १४ ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षतेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावर येथे कॉलराची मोठ्याप्रमाणात दूषित पाण्यामुळे लागण झाली होती. याची दखल घेत आरोग्य सहसंचालक डॉ. जयंत जगताप यांनी अकोला आणि नागपूर मंडळातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर देण्यास सांगितले. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात दरदिवशी तपासणीसाठी चार ते पाच हजार रुग्ण येतात. त्यापैकी २० टक्के रुग्ण हे गॅस्ट्रोच्या आजाराने त्रस्त आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)

डेंग्यूचा धोका
शहरातील अनेक वसाहतींमध्ये मोकळ्या जागेत पाण्याचे डबके साचले आहेत. यातील पाणी निथळ असून त्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होण्यासाठी पुरक स्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. याशिवाय मलेरिया, फायलेरिया, चंडीपुरा व्हायरल या सारख्या कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

ओआरएसचे दोन लाख पॅकेटस्
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडूनही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकार दीपक सिंघला, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डी.डी. भगत यांनी सर्व विभाग प्रमुख आणि जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये जलस्रोत कसे शुद्ध ठेवता येईल, प्रतिबंधात्मक कोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय ओआरएसचे दोन लाख पॅकेट शासनाकडून मिळाले असल्याचेही सांगण्यात आले. याचे घरोघरी जाऊन वितरण करण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

वॉर्डात जमिनीवर रुग्ण
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसाकाठी १०० ते १५० ने वाढली आहे. त्यामध्ये जलजन्य आणि विषाणूजन्य तापाचेही रुग्ण आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखी, उलट्या आणि मळमळ ही लक्षणे असलेले रुग्ण येत आहे. शिवाय गॅस्ट्रोची लागण झालेले १५ ते २० रुग्ण दरदिवशी दाखल होत आहे. शासकीय रुग्णालयात पुरुषांसाठी ६० खाटा तर स्त्रियांसाठी ४५ खाटांची व्यवस्था आहे. त्यामुळे आता रुग्णसेवा वाढल्याने वार्डात खाली गाद्या टाकण्याची वेळ आली आहे.

तिघांचा बळी
गॅस्ट्रोमुळे कळंब तालुक्यात, आर्णी तालुक्यातील पहाबळ येथील महिलेचा शासकीय रुग्णालयात आणि पुसद येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जोरदार झालेल्या पावसाने जलस्रोत दूषित झाले आहे. पाणी गुणवत्ता समितीकडून यलो कार्ड मिळालेल्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींनी जलस्रोताच्या शुद्धीकरणासाठी वेळीच उपाययोजना न केल्यामुळे हा उद्रेक झाला आहे.

पावसाळ्यात नागरिकांनी उकळून पाणी प्यावे, जेणे करून जलजन्य आजाराचा धोका टाळता येईल, शिवाय उघड्यावरचे आणि शिळे अन्न घेणे टाळावे. नागरिकांनी उपचारासाठी हयगय न करता तत्काळरुग्णालयात जाऊन उपचार करावे
- डॉ.बाबा येलके
विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Disease of waterborne diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.