बदल्यांतील घोळामुळे शिक्षकांमध्ये असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:06 AM2018-05-22T01:06:39+5:302018-05-22T01:06:39+5:30
शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्यस्तरावरून ‘एनआयसी’तर्फे जिल्हा परिषद सीईओंकडे पाठविले जात आहेत
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या सुरू असून दोन जिल्ह्यांत आधी बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि त्यांच्या बदलीचे आदेश सीईओंकडे पाठविण्यात आले. मात्र, त्यातील अनियमिततांवर शिक्षकांनी आक्षेप घेत, सोमवारी यवतमाळच्या शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या प्रकाराचा निषेध केला.
शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्यस्तरावरून ‘एनआयसी’तर्फे जिल्हा परिषद सीईओंकडे पाठविले जात आहेत. सर्वात आधी धुळे आणि बुलडाणा जिल्हा परिषदांना बदल्यांचे आदेश मिळाले. एखाद्या शाळेत एकच रिक्त पद असतानाही तेथे दोन शिक्षकांना बदली आदेश देण्यात आला.
अपंग नसलेल्या अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घेतला. सेवाज्येष्ठ शिक्षकांना पसंतीक्रमातील २०पैकी एकही गाव मिळाले नाही. त्याचवेळी कनिष्ठ शिक्षकांना मात्र पसंतीक्रमातीलच गाव मिळाले. असे अनेक घोळ या बदली यादीत आहेत. यवतमाळच्या बदल्यांमध्येही असाच प्रकार आढळला आहे.
तातडीने रुजू करण्याचे गुपित काय?
बदली आदेश मिळाल्यानंतर शिक्षकांना एका दिवसातच नव्या शाळेत रूजू होणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ज्यांनी प्रशासकीय बदलीसाठी अर्ज केले, त्यांना नियमानुसार सात दिवसांचा अवधी मिळणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.