दारव्हा रोडवर भरदिवसा दरोडा
By admin | Published: January 24, 2016 02:14 AM2016-01-24T02:14:16+5:302016-01-24T02:14:16+5:30
दारव्हा रोडस्थित उद्योग भवनासमोरील श्रीकृष्ण सोसायटीत सतीश पाठक यांच्या घरी शनिवारी भरदुपारी सशस्त्र दरोड्याची घटना घडली.
श्रीकृष्ण सोसायटी : पिस्तूलच्या धाकावर महिलेला बांधून ठेवले
यवतमाळ : दारव्हा रोडस्थित उद्योग भवनासमोरील श्रीकृष्ण सोसायटीत सतीश पाठक यांच्या घरी शनिवारी भरदुपारी सशस्त्र दरोड्याची घटना घडली. तीन दरोडेखोरांनी पिस्तूलाच्या धाकावर महिलेला बांधून ठेवून दागिने व रोख रक्कम लुटून नेली. यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडलेल्या या घटनेने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास तीन युवक पाठक यांच्या घरात शिरले. यातील एकाने आपला चेहरा झाकला होता. यावेळी सतीश पाठक हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांचा वृद्ध चौकीदार जेवणासाठी घरी गेला होता. स्वयंपाकघरात असलेल्या शर्मिला पाठक (६३) यांना दोघांनी पिस्तूलाचा तर एकाने चाकूचा धाक दाखविला. त्यांना तिजोरी असलेल्या खोलीत ओढत आणून मौल्यवान वस्तूंची मागणी करण्यात आली. त्यांना खुर्चीत बसवून चोरट्यांनी कपाटात ऐवजाची शोधाशोध केली. तेथे त्यांना सोन्याचे मंगळसूत्र व पर्समध्ये रोख दोन हजार रुपये मिळाले. शर्मिला यांनी जीवाच्या भीतीने हातातील गोल्ड प्लेटेड बांगड्या दरोडेखोरांना काढून दिल्या. १५ ते २० मिनिट घरात लुटालूट केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असल्याचे लक्षात येताच त्यांनी या कॅमेराचे मेमरीकार्ड, डीव्हीवार, सेटटॉप्स बॉक्स, मोबाईलचे सीमकार्ड सोबत नेले. जाण्यापूर्वी शर्मिला यांचे हात बांधण्यात आले. त्यांच्या डोळ्यावरही पट्टी लावण्यात आली. बाहेर जाताना चोरट्यांनी घराचे दार व गेट बंद केले. काही वेळानंतर शर्मिला यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. दुसऱ्या दाराने त्या बाहेर आल्या. यावेळी घरासमोरून जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मोबाईल घेऊन त्यांनी पती सतीश पाठक यांना घटनेची माहिती दिली. नंतर काही वेळातच वडगाव रोड पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. दरोडेखोरांच्या हाताचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न सुरू होता. हे दरोडेखोर शेजारील अन्य कुणाच्या सीसीटीव्ही कैद झाले का, हे तपासले जात आहे. दरोडेखोर पाळत ठेवणारेच असावे, असा संशय आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
दरोडेखोर संख्येने तिघे असल्याने पोलिसांच्या नजरेत ही जबरी चोरी असली तरी त्या तिघांची कृती ही अट्टल दरोडेखोरांनाही लाजविणारी होती, हे विशेष.
दरोडेखोर म्हणाला, मरवाओगी क्या...
तीनही दरोडेखोर आपसात हिंदीत बोलत होते. त्यांच्या हातातील पिस्तूल पाहून शर्मिला गोंधळल्या, तेव्हा ‘झूठ लगता क्या, गोली देख’ असे म्हणून त्यांना पिस्तूलातील गोळ्या दाखविल्या. त्यानंतर सीसीटीव्ही दिसताच ‘मरवाओगी क्या, बताया नही सीसीटीव्ही लगा है, इसकी चिप कहा है’ अशी विचारणा केली.