यवतमाळ शहरात निर्जंतुकीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:18+5:30
यवतमाळ नगरपरिषदेने मिनी फायर असलेल्या अग्निशमन बंबात सोडीयम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार केले आहे. हे मिश्रण थेट परिसरात फवारले जात आहे. विशेष करून ज्या भागातील कोरोना संशयित रुग्ण मिळाले, कोरोनाग्रस्त आहेत अशा परिसरात नियमित फवारणी केली जाणार आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंधक वॉर्ड परिसरातही अग्निशमन बंबाच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. यवतमाळातही कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहे. संशयित रुग्णही वाढत आहे. अशा स्थितीत शहरातील सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपालिकेने फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. हातपंपाचा वापर मर्यादित होत असल्याने अग्निशमन बंबाच्या सहाय्याने फवारणी केली जात आहे. खुद्द मुख्याधिकाऱ्यांच्या देखरेखीत हे काम सुरू आहे.
यवतमाळ नगरपरिषदेने मिनी फायर असलेल्या अग्निशमन बंबात सोडीयम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार केले आहे. हे मिश्रण थेट परिसरात फवारले जात आहे. विशेष करून ज्या भागातील कोरोना संशयित रुग्ण मिळाले, कोरोनाग्रस्त आहेत अशा परिसरात नियमित फवारणी केली जाणार आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंधक वॉर्ड परिसरातही अग्निशमन बंबाच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. त्यानंतर गायत्री लॉनसमोरच्या चर्च रोडवर, राधिका ले-आऊट यासह सिव्हिल लाईन व शहराच्या गर्दीच्या काही ठिकाणी फवारणी करण्यात आली. सायंकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे फवारणीचे काम थांबवावे लागले.
या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या नियंत्रणात हातपंपाने फवारणी सुरू आहे. नगरपालिकेचे २० हातपंप चार दिवसांपासून फवारणीचे काम करत आहे. ज्या भागात दाट लोकवस्ती व सतत घाण असते अशा परिसराला पहिल्यांदा निर्जंतुकीकरण करण्याचा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी शक्य त्या सर्वच उपाययोजना वरिष्ठ पातळीवरून येणाºया निर्देशानुसार राबविल्या जात आहे. या काळात नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कचरा इतरत्र न फेकता घंटागाडीतच टाकावा, घराच्या परिसरातही स्वच्छता ठेवावी, असे आवाहन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात फवारणी
सध्या कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिपत्याखाली काम करत आहे. त्यामुळे येथील कार्यालयातही येणाºया-जाणाऱ्यांची वर्दळ पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे. दक्षतेचा भाग म्हणून नगरपरिषद आरोग्य विभागाने थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात निर्जंतुकीकरणाची फवारणी केली. टप्प्याटप्प्याने शहरातील वर्दळीच्या व गर्दी होणाºया ठिकाणांवर पालिकेकडून फवारणी केली जाणार आहे. फवारणीचे शेड्यूल तयार केले असून नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा यामध्ये लागली आहे. शहरात स्वच्छता व निर्जंतुकीकरण या दोन्ही प्रक्रिया सोबतच राबविण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.